वाळू माफियांना नोटीस

By Admin | Updated: September 7, 2014 00:25 IST2014-09-06T23:08:26+5:302014-09-07T00:25:01+5:30

माजलगाव : सोन्याच्या भावात विकल्या जाणाऱ्या वाळूची साठेबाजी करून पैसे कमाविण्याचा गोरख धंदा माजलगाव तालुक्यात जोरात सुरू आहे़

Notice to the sand mafia | वाळू माफियांना नोटीस

वाळू माफियांना नोटीस


माजलगाव : सोन्याच्या भावात विकल्या जाणाऱ्या वाळूची साठेबाजी करून पैसे कमाविण्याचा गोरख धंदा माजलगाव तालुक्यात जोरात सुरू आहे़ महसूल प्रशासनाने तालुक्यात अवैध वाळू साठा करणाऱ्या ७ जणांना नोटीसा बजावून फौजदारी कारवाया करण्याचा इशारा दिला आहे़
बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वाळूला सध्या सोन्याचा भाव आला आहे़ तालुक्यातून गोदावरी नदी वळसा मारून गेलेली आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात येथून वाळूचे उत्खन्न करण्यासाठी महसूल प्रशासनाने लाखो रुपयांचे टेंडर काढते़ राजकीय पुढारी सर्वसामान्यांना हाताशी धरून हे लिलाव घेतात व यातून शासनाची करोडो रुपयांची माया कमविली जाते़ अनेक जणांनी हजारो ब्रासचे अवैध वाळूचे साठे करून ठेवले आहेत़ याचा फायदा त्यांना पावसाळ्यात होतो़ वाळूचा अवैध साठा करणे कायद्याने नियमबाह्य आहे़ त्यामुळे तालुक्यातील अवैध साठा करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे़ शहरातील ३ व तालुक्यातील ४ वाळू साठा करणाऱ्यांना तहसीलदार डॉ़ अरूण जऱ्हाड यांनी नोटीसा बजावल्या आहेत़ २४ तासाच्या आत नोटिसांना उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाया करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे़
मुदत संपूनही कारवाई
करण्यास मुहूर्त मिळेना
२८ आॅगस्ट रोजी तहसीलदार अरूण जऱ्हाड यांनी अवैध वाळू साठा करणाऱ्या आठ जणांना नोटिसा पाठविल्या होत्या़ यात २४ तासात नोटिसाला उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही दिला आहे़ परंतु नोटीस देऊन आठवडा उलटला तरीही तहसीलदार जराड यांनी कारवाई केलेली नाही़ त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईवर सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे़
तालुक्यात अनेक वाळू साठे
माजलगाव तालुक्यात आठ नाही तर अनेक वाळू साठे असल्याचे बोलले जात आहे़ महसूल प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात जाऊन वाळू साठा करणाऱ्यांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे़ तालुक्यात छोटे मोठे अवैध वाळू साठा करणारे वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर आहेत़ मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास महसूल प्रशासनाला मुहुर्त मिळेनासा झाला आहे़
नोटिसा बजावलेल्यांमध्ये अनेक जण राजकीय पुढारी तर काही नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे़ राजकीय पुढाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे़ (वार्ताहर)
संजय संतराम खळगे-३० ब्रास, फैसल आमेर चाऊस-४० ब्रास, जावेद आगारखान-१५ ब्रास यांच्यासह तालुक्यातील मनोज बाळाभाऊ जगताप-८०० ब्रास, मोहन बाजीराव जगताप-२०० ब्रास, यशवंत पांडूरंग येरंडे - १५०, रामेश्वर धडपडे - ३०० ब्रास, अप्पा कडाजी जाधव-१२६ ब्रास असा एकूण १ हजार ६६१ ब्रास वाळूचा अनाधिकृत साठा आहे़ याची किंमत २९ लाख २२ हजार रूपये आहे़ महसूल प्रशासनाने बजावलेल्या दंडाची किंमत १ कोटी १६ लाख ८८ हजार एवढी आहे़ या सर्व वाळू साठा करणाऱ्यांना तहसीलदार अरूण जऱ्हाड यांनी नोटिसा बजावल्या आहेत़

Web Title: Notice to the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.