बीड : तालुक्यातील शिवणी व गोलंग्री येथे मग्रारोहयोच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. सोमवारी सीईओ नामदेव ननावरे यांनी १९ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय वाकडी (ता. अंबाजोगाई) येथील प्रकरणात तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवकाच्या सेवासमाप्तीची शिफारस केली आहे. शिवणी येथे विहिरी, रस्त्यांच्या कामांत लाखोंचा अपहार झाल्याची तक्रार विजय सुपेकर यांनी केली होती. जि.प. च्या मग्रारोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन अहवाल दिला होता. त्यानंतर ग्रामसेविका रोशनी घाडगे यांचे निलंबन झाले तर ग्रामरोजगार सेवक रामदास सानप व तांत्रिक अधिकारी मोहन शेळके यांच्यावर बडतर्फीचा बडगा उगारला होता. सीईओ ननावरे यांच्या आदेशावरुन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. पोहरे यांनी सहा जणांना नोटीस दिली. माजी सरपंच शकुंतला सुपेकर, तत्कालीन ग्रामसेविका घाडगे, तत्कालीन ग्रामरोजगारसेवक सानप, तत्कालीन तांत्रिक अधिकारी शेळके व बोगस एजन्सी दाखविल्यावरुन तुळजाई डेव्हीलपर्सचे महेश सुपेकर, जय हनुमान ड्रिलींग कॉन्ट्रॅक्टर आण्णासाहेब सुपेकर यांना देखील कारणे दावा नोटीस दिली आहे. शिवणीतील मजुरांना वाटप केलेल्या निधीचे विवरण मागवून देखील दिले नाही. त्यामुळे खडकपुरा भागातील पोस्ट कार्यालयातील अधीक्षकांना सीईओ ननावरे यांनी नोटीस बजावली आहे.वाकडी (ता. अंबाजोगाई) येथे शेततळ्यातील अनियमिततेच्या प्रकरणात तांत्रिक अधिकारी डी. बी. बोरखडे व ग्रामरोजगारसेवक गणेश माने यांची सेवा समाप्त करण्याची शिफारस राजेंद्र मोराळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चौकशी अहवालात या दोघांवर ठपका आहे.गोलंग्री प्रकरणी १२ जणांना नोटीसगोलंग्री येथील घोटाळ्याच्या अनुषंगाने १२ जणांना नोटीस बजावली आहे. सरपंच मनीषा कवडे, तत्कालीन ग्रामसेवक आर. आर. दळवी, ग्रामसेवक ए. ए. कुलकर्णी, ग्रामरोजगारसेवक सोमनाथ कवडे, तांत्रिक अधिकारी एस. पी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता एस. यू. कोटूळे, तलाठी चौरे, जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपअभियंता गर्जे, हजेरी सहायक ए.ए. उबाळे, लाभार्थी शिवाजी कवडे, पं. स. चे तत्कालीन सहायक लेखाधिकारी कागदे, कनिष्ठ सहायक आखाडे यांचा समावेश आहे.चौसाळा पोस्टकार्यालयाचे प्रशासनाला असहकार्यगोलंग्री येथील मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांच्या देयकांची माहिती देण्यास चौसाळा येथील सहायक पोस्ट मास्तरने टाळाटाळ केली आहे. मजुरांच्या नावाने रक्कमा उचलल्या की पोस्टात जमा आहेत? याची माहिती न दिल्याने जि.प. मग्रारोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी मोराळे यांनी सहायक पोस्ट मास्तरला नोटीस दिली आहे. कारवाईकडे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
गोलंग्री, शिवणी प्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 23:27 IST