समांतरच्या कंपनीला नोटीस
By Admin | Updated: February 3, 2015 01:01 IST2015-02-03T00:57:06+5:302015-02-03T01:01:39+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पालिका प्रशासनाने करार रद्द करण्याचा धमकीवजा इशारा देणारी नोटीस आज बजावली आहे.

समांतरच्या कंपनीला नोटीस
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पालिका प्रशासनाने करार रद्द करण्याचा धमकीवजा इशारा देणारी नोटीस आज बजावली आहे. जलवाहिनीचे काम तातडीने सुरू केले नाही, तर कंपनीने येथून चालते व्हावे, असा सूर प्रशासनाने सहा महिन्यांतच आळविला आहे. कंपनी मार्चनंतर पोबारा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे.
कंपनी नवीन जलवाहिनीचे काम सुरू करीत नाही. डागडुजीच्या कामांकडे व अंतर्गत जलवाहिनीच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. १५ फेबु्रवारीपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा कंपनीने शब्द दिला आहे. मात्र, अजून कंपनीची कुठलीही तयारी नसल्यामुळे प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत आहे, तसतसे समांतर जलवाहिनीच्या कामावरून राजकारणही तापू लागले आहे. आज महापौर बंगल्यावर जलवाहिनीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीतच जोरदार हंगामा झाला. महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सदस्य समीर राजूरकर, गटनेते गजानन बारवाल, अफसर खान, आयुक्त महाजन, शहर अभियंता एस. डी. पानझडे, हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती.
कंपनीचे दोन प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असल्यामुळे बैठकीत वाद चिघळला. नगरसेवक खान यांनी रखडलेल्या जलवाहिनीच्या कामाची संचिका अभियंता कोल्हे यांच्या दिशेने भिरकावली.
हर्सूल तलावातील पाणी आटत आले आहे. त्यामुळे जायकवाडीवरून १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी कंपनीकडे काय नियोजन आहे, याची विचारणा उपमहापौर संजय जोशी यांनी केली. कंपनीचे प्रतिनिधी म्हणाले, जायकवाडी पंप वाढवून पाणीपुरवठा करू. कंपनीने मोघम उत्तर दिल्यामुळे समिती सदस्य संतापले. कुठलीही व्यवस्था करता येत नसेल तर उन्हाळ्यात नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता सदस्यांनी वर्तविली.
नवीन जलवाहिनी टाकणे, व्हॉल्व्ह दुरु स्ती करण्याची कामे कंपनीने केली नाही, तर ती कामे पालिका करील.
कंपनीला दरमहा देण्यात येणाऱ्या ५ कोटी रुपयांतून केलेल्या कामांची रक्कम कपात करण्याचा निर्णय बैठकीत झाला. मनपाने चार दिवस शटडाऊन घेऊन दुरुस्तीची, जलवाहिनीची कामे हाती घ्यावीत. प्रशासनाने कंपनीला कामांत सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे. पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठ्यावर पुन्हा बैठक होईल, असे उपमहापौर जोशी यांनी सांगितले.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा शब्द कंपनीने दिला आहे; परंतु पाणीपुरवठ्याचे कुठलेही व्यवस्थापन नसल्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा कागदावरच राहणार आहे.
४समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला १५ फेबु्रवारीपर्यंत पालकमंत्री रामदास कदम यांनी डेडलाईन दिली आहे.
समांतरचा करार तपासा, त्यातील चुकीच्या बाबी पाहा, असे आदेश पालकमंत्र्यांनी आयुक्त पी. एम. महाजन यांना दिले आहेत. त्यानंतरच मनपाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
४कंपनीच्या प्रतिनिधींना मनपाच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याची एबीसीडी समजावून सांगावी लागते.
समांतर जलवाहिनीच्या कामासाठी तत्कालीन केंद्र व राज्य शासनाने १६२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यावर ७२ कोटी रुपयांचे व्याज बँकेत जमा झाले आहे. २३२ कोटी रुपयांचा योजनेचा निधी आहे. त्याचा पहिला हप्ता ३१ मार्चपूर्वी कंपनीला देण्यासाठी मनपातील अधिकारीच पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी पत्रव्यवहारदेखील झाला आहे.