मनपा आयुक्तांना अवमानप्रकरणी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:37 IST2017-10-07T00:37:35+5:302017-10-07T00:37:35+5:30
खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.

मनपा आयुक्तांना अवमानप्रकरणी नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे दाखल अवमान याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०१७ रोजी होणार आहे.
२०१४ साली हर्सूल तलावात पोहण्यास गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता; मात्र २०१६ पर्यंत महापालिकेकडून आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सय्यद फैजुद्दीन व इतर यांनी २०१६ मध्ये वरील आर्थिक मदत मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने ती याचिका मंजूर करून ठरावाप्रमाणे आर्थिक मदत तीन महिन्यंत संबंधितांना देण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. त्या आदेशाची पूर्तता झाली नाही. म्हणून याचिकाकर्त्यांनी मनपा आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रमीज मकसूद शेख काम पाहत आहेत.