गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: February 6, 2015 00:56 IST2015-02-06T00:47:16+5:302015-02-06T00:56:30+5:30
लातूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या पाच अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.

गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
लातूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला गैरहजर असणाऱ्या पाच अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी २७ जानेवारी रोजी प्रशासकीय इमारतीच्या डीपीडीसी सभागृहात नियोजन समितीची आढावा बैठक घेतली होती. या आढावा बैठकीला जिल्हा रेशीम अधिकारी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व अन्य एक अधिकारी गैरहजर होते. हजेरी पटावर उपस्थितीची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या पाचही अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठविली आहे. आठ दिवसांच्या आत उत्तर द्या, असेही नोटिशीत म्हटले आहे.
नियोजन समितीच्या बैठकीत या अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने काही विषय होते. परंतु, अधिकारी उपस्थित नसल्यामुळे बैठकीत निर्णय झाला नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या नोटिसा बजावल्या असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलघन यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या लघुगट समितीची बैठक झाली होती. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित होते. त्यावेळी अनुपस्थित असलेल्या महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह अन्य अधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असल्याचे नियोजन अधिकारी कोलघन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक २७ जानेवारी रोजी झाली होती. या बैठकीला एकूण पाच अधिकारी गैरहजर राहिले होते. या अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने नियोजन बैठकीत विषय होते. पूर्वसूचना देऊनही सदर अधिकारी गैरहजर का राहिले, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी केला होता. त्याचवेळी नोटिसा पाठविण्याचे त्यांनी सुचित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार उपस्थिती नोंद पाहून गुरुवारी नोटिसा बजावल्या आहेत.