४०० महाविद्यालयांना नोटीस

By Admin | Updated: August 10, 2014 02:02 IST2014-08-10T01:33:52+5:302014-08-10T02:02:31+5:30

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

Notice to 400 colleges | ४०० महाविद्यालयांना नोटीस

४०० महाविद्यालयांना नोटीस

औरंगाबाद : जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे न पाठविल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
जिल्ह्यातील ५६८ महाविद्यालयांपैकी ४०० महाविद्यालयांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न पाठविल्याने जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी मंत्रालयात शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत हजारो विद्यार्थी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वंचित असल्याचे निदर्शनास आले होते.
विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले असतानाही त्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल न केल्याने संबंधित महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत. महाविद्यालयांनी नोटीसला गांभीर्याने न घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे.
अनेक मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित असतानाही महाविद्यालयाने बी स्टेटमेंट का दाखल केले नाही, याचा खुलासा तीन दिवसांत करावा अन्यथा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार
महाविद्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी.
-संदीप कुलकर्णी, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
मान्यता रद्द करावी
महाविद्यालयांच्या गोंधळाच्या कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी. शिष्यवृत्तीच्या अपेक्षाने अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. शिष्यवृत्ती न मिळाल्याने गरीब विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. -सचिन निकम, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना

Web Title: Notice to 400 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.