१५४ कर्मचाऱ्यांना नोटीस
By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:44:42+5:302014-09-22T00:54:50+5:30
लातूर : विधानसभा निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी रविवारी औसा येथे निवडणुकीसाठीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले़

१५४ कर्मचाऱ्यांना नोटीस
लातूर : विधानसभा निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी रविवारी औसा येथे निवडणुकीसाठीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले़ या प्रशिक्षणास १५४ जणांनी दांडी मारल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़
विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे़ औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील कासारशिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी मंडळ आणि औसा तालुक्यातील भादा मंडळ वगळता अन्य गावे आहे़ या मतदारसंघात ३०३ मतदान केंद्र आहेत़ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावे, मतदारांत जनजागृती व्हावी तसेच निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऐनवेळी कुठलीही अडचण येऊ नये़ मतदानावेळी घ्यावयाची काळजी, मतदानयंत्र हाताळण्याची माहिती व्हावी अशी इत्यंभूत माहिती व्हावी म्हणून रविवारी औसा विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते़ औशाच्या प्रशासकीय इमारतीतील या दोन सत्रातील प्रशिक्षणास १६४३ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित होते़ परंतु, त्यापैकी १४८९ जण उपस्थित राहिले़ उर्वरित १५४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास दांडी मारली़ त्यामुळे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डी़ एऩ भारस्कर यांनी त्याची गंभीर दखल घेत अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
या प्रशिक्षणात मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी मार्गदर्शन केले़ तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजूरकर यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष कामकाज कसे हाताळावे यासंदर्भात प्रोजेक्टरद्वारे माहिती दिली़ (प्रतिनिधी)