बाभळीच्या झाडाला लगडली नोटांची बंडले
By Admin | Updated: June 12, 2017 00:31 IST2017-06-12T00:30:40+5:302017-06-12T00:31:22+5:30
औरंगाबाद एका अज्ञाताने बाद चलनातील सुमारे साडेदहा लाख रुपयांच्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा ११ जून रोजी सिडको एन-२ येथील एका सहान प्लॉटवरील झाडावर फेकून दिल्या.

बाभळीच्या झाडाला लगडली नोटांची बंडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुन्या चलनातील लाखो रुपयांचा काळा पैसा आजही अनेकांकडे पडून असावा. काळा पैसा बाळगणाऱ्या अशाच एका अज्ञाताने बाद चलनातील सुमारे साडेदहा लाख रुपयांच्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा ११ जून रोजी सिडको एन-२ येथील एका सहान प्लॉटवरील झाडावर फेकून दिल्या. या नोटा व त्याची काही बंडले झाडाला लगडलेली, तर काही नोटांचा सडा झाडाखाली पडलेला होता. प्लॉटशेजारी राहणारे सतीश गोरे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी या सर्व नोटा जप्त केल्या.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातील हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बाद झाल्या. ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व्ह बँकेकडून या नोटा बदलून घेण्याची संधी नागरिकांना देण्यात आली होती. शिवाय आयकर विभागानेही काळा पैसा पांढरा करण्याची संधी दिली होती. या संधीनुसार ४५ टक्केपर्यंतची रक्कम शासनाच्या तिजोरीत दंड रूपाने जमा होऊन उर्वरित मालमत्ताधारकास परत मिळत होती. ३१ मार्चनंतर जुन्या नोटा जवळ बाळगणे कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला.
अशाच प्रकारच्या बेहिशेबी नोटा दोन महिन्यांपूर्वी गारखेडा परिसरात तुकडे करून फेकून देण्यात आल्या होत्या. रविवारी (दि.११) सकाळी सिडको एन-२ कामगार चौकाजवळील सहान प्लॉटवरील (क्रमांक ७९) बाभळीच्या झाडावर आणि खाली जुन्या, हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आणि नोटांची बंडले फेकून दिल्याचे आढळले. इरा इंटरनॅशनलचे सतीश गोरे यांनी प्रसारमाध्यमांना आणि नंतर पोलिसांना कळविले.
मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार, पोलीस कर्मचारी एस. बी. सोहळे, प्रवीण कापरे, महिला कॉन्स्टेबल माधुरी खरात यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तेथील झाडाझुडपात आणि बाभळीच्या झाडावर अडकलेली नोटांची बंडले काढून मोजणी केली.
आयकर विभागाला कळविणार- शिवाजी कांबळे
पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, आयकर विभागाची धाड पडण्याच्या भीतीपोटी अथवा बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या या नोटा संबंधितांना बँकेत भरता आल्या नसाव्यात, म्हणून त्याने साडेदहा लाखांच्या या जुन्या नोटा अशा फेकून दिल्या. या नोटांचे बाजारात मूल्य शून्य आहे, असे असले तरी या नोटांची माहिती आयकर विभागाला कळविण्यात येणार आहे. या नोटा एखाद्या इमारतीवरून फेकण्यात आल्या असाव्यात, असा संशय आहे.