सिल्लोडमध्ये ‘नोटा’साठी स्वतंत्र ईव्हीएम लागणार
By Admin | Updated: October 6, 2014 00:44 IST2014-10-06T00:31:29+5:302014-10-06T00:44:17+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत.

सिल्लोडमध्ये ‘नोटा’साठी स्वतंत्र ईव्हीएम लागणार
औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत. सिल्लोड मतदारसंघात तर केवळ ‘नोटा’साठी वेगळी ईव्हीएम लावावी लागणार आहे.
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी तब्बल १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, पैठण, गंगापूर, सिल्लोड या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदानासाठी दोन दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. प्रत्येक ईव्हीएममध्ये १६ बटन्सची व्यवस्था आहे. मात्र, गतवर्षीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदारांना ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) चा पर्यायही उपलब्ध झाला आहे. हा पर्याय सर्व उमेदवारांच्या नावानंतर असणार आहे.
सिल्लोड मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ आहे. त्यामुळे पहिल्या यंत्रावर सर्व १६ नावे उमेदवारांची राहतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. कोकणी यांनी सांगितले.
सिल्लोड मतदारसंघात एकूण २९५ मतदान केंद्रे असणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या नावासाठी एक आणि नोटासाठी एक, अशा ५९० ईव्हीएम मशीन लागणार आहेत. याशिवाय दहा टक्के राखीव मशीन ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे येथे ६५० ईव्हीएमची गरज भासणार आहे.