वाळूजची रॉकेल, धान्यटंचाई पुरवठा विभागाच्या गावीही नाही
By Admin | Updated: July 1, 2014 01:07 IST2014-07-01T00:51:22+5:302014-07-01T01:07:47+5:30
वाळूज महानगर : वाळूजच्या रॉकेल व धान्य टंचाईकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे लाभार्थींची गैरसोय होत आहे.

वाळूजची रॉकेल, धान्यटंचाई पुरवठा विभागाच्या गावीही नाही
वाळूज महानगर : वाळूजच्या रॉकेल व धान्य टंचाईकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे लाभार्थींची गैरसोय होत आहे.
अनेक शिधापत्रिकाधारकांनी रॉकेल व धान्य नियमितपणे मिळत नसल्याची तक्रार ग्रामपंचायतकडे केली आहे. गावात एकूण ७ स्वस्त धान्य दुकाने असून, १४ किरकोळ रॉकेल विक्रेते आहेत. ७ पैकी ५ दुकाने जुन्या गावात असून साठेनगर व कमळापूर रोडला प्रत्येकी एक दुकान आहे. जुन्या गावाची लोकसंख्या मर्यादित असूनही तेथे जास्त स्वस्त धान्य दुकाने आहेत. नवीन वसाहतीतील कार्डधारकांना धान्य व रॉकेलसाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. कामगारांना रजा घेऊन स्वस्त धान्य दुकानासमोर सकाळपासूनच रांगेत थांबावे लागते. अनेक शिधापत्रिकाधारकांना विक्रेते कोटा कमी आला यासह वेगवेगळी कारणे सांगून रॉकेल देण्यास टाळाटाळ करतात. रेशन दुकानावरील धान्य व रॉकेलचे वितरण व्यवस्थित व्हावे, यासाठी गावपातळीवर दक्षता समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, दक्षता समितीचे पदाधिकारी या तक्रारींबद्दल काहीच बोलत नाहीत.
इंधनासाठी जवळपास लाकडेही मिळत नाहीत. ३० जूनपासून रमजानचा महिना सुरू झाला असून, रॉकेल मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे.
ग्रामपंचायतीमध्ये ठराव
गावात शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य व रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थींनी ग्रामपंचायतीकडे केल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानदार तसेच रॉकेल विक्रेते जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत मनमानी करतात. स्वस्त धान्य व रॉकेल विक्रीच्या वेळा दुकानदार पाळत नाहीत. त्यांच्या सोयीप्रमाणे केव्हाही दुकाने उघडतात व बंद करतात. लोकसंख्येच्या तुलनेत रॉकेलचा पुरवठा कमी होत आहे. रमजान महिन्यासाठी रॉकेल व धान्याचा कोटा वाढविण्यात यावा, असा ठराव ग्रामपंचायतीने तहसीलला पाठविला आहे, अशी माहिती सरपंच रंजना भोंड, उपसरपंच खालेद पठाण यांनी दिली.