युतीच्या मुद्यावर सहमती नाहीच..!
By Admin | Updated: December 30, 2016 00:01 IST2016-12-29T23:58:37+5:302016-12-30T00:01:04+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर पालिकेत युती करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

युतीच्या मुद्यावर सहमती नाहीच..!
उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर पालिकेत युती करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सेनेसह भाजपानेही उपनगराध्यक्षपद आपल्यालाच द्यावे, अशी भूमिका घेतल्याने ही बैठक कुठल्याही निर्णयाविना संपल्याने आता हे दोन्ही पक्ष उस्मानाबाद पालिकेत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मकरंद राजेनिंबाळकर यांनी विजयश्री खेचून आणली. सेनेचा भगवा उस्मानाबाद पालिकेवर फडकाविला आहे. सध्यस्थितीत शिवसेनेकडे ११ सदस्य असून, भाजपाचे ८ सदस्य निवडून आले होते. मात्र नगरसेवक अनिल मंजुळे यांचे अपघाती निधन झाल्याने भाजपाची संख्याबळ आता ७ एवढे आहे, तर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक १७ सदस्य असून, काँग्रेस २ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांनी पदभार घेतल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उपनगराध्यक्षासह स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पालिकेत शिवसेना-भाजपाची युती व्हावी असे मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेकडून नगरसेवक सुरज साळुंके उपनगराध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. तर भाजपाकडून राहुल काकडे आणि योगेश जाधव यांची नावे चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमिवर या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून माजी आमदार ओम राजेनिंबाळकर आणि नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तर भाजपाकडून आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्र्णीे यांच्यासह नितीन काळे यांची उपस्थिती होती. बैठकीत शिवसेनेसह भाजपानेही उपनगराध्यक्ष पदाची मागणी केली. मात्र यावर कसलेही मतैक्य होऊ शकले नाही.
उपाध्यक्षपद शिवसेनेला सोडा त्या बदल्यात विषय समिती सभापती पदे भाजपला देतो अशी शिवसेनेची भूमिका होती, तर उपाध्यक्षपद भाजपला सोडा बाकीचे नंतर पाहू, असे भाजपाचे म्हणणे होते. बैठकीच्या अखेरपर्यंत या मुद्द्यावर कसलेही एकमत न झाल्याने कुठल्याही निर्णयाविना बैठक संपविण्यात आली. (प्रतिनिधी)