पाहुण्याने कापले शहराचे नाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:14 IST2017-08-07T00:14:24+5:302017-08-07T00:14:24+5:30
अभिनेता सुमित राघवनने स्थानिक नाट्यगृहांची दयनीय अवस्था फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.

पाहुण्याने कापले शहराचे नाक
औरंगाबाद : शहरातील नाट्यगृहांची दुरवस्था शतदा समोर आणूनही मनपा प्रशासन ढिम्म ते ढिम्मच! शहरातील नागरिक ओरडून ओरडून थकल्यानंतर आता अभिनेता सुमित राघवनने स्थानिक नाट्यगृहांची दयनीय अवस्था फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओद्वारे दाखवून प्रशासनाचा ढिसाळ कारभार जगासमोर मांडला.
एका नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते शनिवारी (दि.६) शहरात आले होते. नाटकाची टीम संत एकनाथ रंगमंदिरात पोहोचली तेव्हा तुटलेल्या खुर्च्या, मोडलेला रंगमंच, अस्वच्छता, मेकअप रूमची दुरवस्था, स्वच्छतागृहांची दुर्गंधी, अशी विदारक स्थिती पाहून चकितच झाली. रंगमंचाची विटंबना सहन न झाल्याने त्यांनी लागलीच तेथून फेसबुकवर या सर्व परिस्थितीचे चित्रण लाइव्ह दाखविण्यास सुरुवात केली.
तो म्हणतो, ‘आम्ही कलाकार १२-१२ तास प्रवास करून येथे आलो आणि अशा ठिकाणी आम्हाला प्रयोग करावा लागत आहे. आमच्या महिला कलाकार तर मेकअप रूममध्ये जाण्यासही तयार नाहीत, एवढी वाईट स्थिती आहे.’ या व्हिडिओमध्ये मग तो दुभंगलेले स्टेज, कुशन निघालेल्या खुर्च्या, जिकडे-तिकडे पडलेला कचरा, भिंती व दरवाजामागे थुंकलेले, स्वच्छतागृहातील अस्वच्छता दाखवतो.
संत एकनाथ रंगमंदिराला दुर्लक्षित नाट्यगृह संबोधून तो म्हणतो की, ‘आम्ही जेव्हा येथील कर्मचाºयाला पडलेला कचरा दाखवला तेव्हा त्याने ‘या वेळेला माणसे मिळत नाहीत’, असे कारण सांगून मोकळा झाला.’ यापूर्वी प्रशांत दामले यांनी स्वत: झाडू मारून नाट्यगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. मध्यंतरी शहरातील नाट्यप्रेमी व कलाकारांनीसुद्धा एकत्र येऊन मनपाला नाट्यगृहांबाबत निवेदन दिले होते.