आवक नसलेल्या शेतमालाचाही सौदा!
By Admin | Updated: March 11, 2017 23:45 IST2017-03-11T23:44:51+5:302017-03-11T23:45:22+5:30
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़

आवक नसलेल्या शेतमालाचाही सौदा!
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़ त्यामुळे त्याचे दरही दररोज कमी जास्त होत असतात़ विशेष म्हणजे सौद्याच्या वेळी जो शेतमाल असतो त्यातच लिलाव होतो़ मात्र लातुरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी पाच प्रकारच्या शेतमालाची आवक शून्य असतानाही त्याचा सौदा निघाला आहे़ पाचपैकी दोन धान्याचा कमाल, किमान व सर्वसाधारण असा दरही जाहीर झाला़ बाजार समितीच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे़
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरिपाबरोबर रबी हंगामातील पिकांना लाभ झाला आहे़ सध्या बहुतांश शेतकरी तूर व हरभऱ्याच्या राशी करण्यात मग्न आहेत़ ज्या शेतकऱ्यांच्या राशी झाल्या आहेत ते शेतकरी विक्रीसाठी शेतमाल बाजार समितीत आणत आहेत़ त्यामुळे आवक वाढत आहे़ त्याचबरोबर लातुरातील बाजार समितीत चांगला दर मिळतो, असा अनेक शेतकऱ्यांना अनुभव असल्याने जिल्ह्याबरोबर सीमावर्ती भागातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात़
शुक्रवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ प्रकारच्या शेतमालाची आवक झाली़ त्यात सर्वाधिक आवक हरभरा, तूर आणि सोयाबीनची झाली असून, बाजरी, गहू, ज्वारी, मका, मूग, करडई, गूळ या शेतमालाची आवक अल्पप्रमाणात झाली होती़ एकूण आवक ३२ हजार २८४ क्विंटल झाली होती़ अंबाडी, जवस, कारळे, धने, मोहरी या शेतमालाची आवक झाली नसतानाही त्याचा सौदा पुकारण्यात आला़ वास्तविक पाहता दररोज आवक होणाऱ्या शेतमालाची पाहणी करून त्याचा सौदा होतो़ मात्र शुक्रवारी या पाच प्रकारच्या शेतमालाची आवक नसतानाही सौदा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे़