महापालिकेच्या वॉल्व्हो बसच्या तिकीट दरवाढीस मंजुरी

By Admin | Updated: July 19, 2014 00:59 IST2014-07-19T00:59:57+5:302014-07-19T00:59:57+5:30

गुडेवारांनी केलेल्या १९ कामांच्या चौकशीची शिफारस

Nomination for municipal walvo bus ticket price hike | महापालिकेच्या वॉल्व्हो बसच्या तिकीट दरवाढीस मंजुरी

महापालिकेच्या वॉल्व्हो बसच्या तिकीट दरवाढीस मंजुरी


सोलापूर : एसएमटीच्या (महानगरपालिका परिवहन उपक्रम) वॉल्व्हो बसच्या तिकीट दरात २५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
१७ जून रोजी तहकूब झालेली सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी झाली. सभेत सभागृह नेते महेश कोठे यांनी प्रभारी परिवहन व्यवस्थापकाकडून वॉल्व्हो बस तिकीट दर वाढीचा प्रस्ताव मांडला. वॉल्व्हो बस तोट्यात चालत असल्याने ३0 टक्के दरवाढ करण्याची त्यांनी मागणी केली होती. सभागृहाने २५ टक्के भाडेवाढला एकमताने मान्यता दिली. तसेच १४00 रुपये भरल्यास महिनाभर वॉल्व्हो किंवा कोणत्याही बसने नागरिकांना शहरात फिरता येईल व १६00 भरल्यास शहराबरोबरच हद्दीबाहेरही फिरता येईल. दिवसाला हेच भाडे १२0 रुपये असेल. तसेच प्रभाग १८ मध्ये विजेचे खांब उभारून दिवाबत्ती करण्यास, विशेष अनुदानातून शहरातील शौचालये, रस्ते करणे, बागांचा विकास करण्याच्या कामाला एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच सहयोगनगर ते वसुंधरा कॉलेज, डी फॉर्मसी कॉलेज ते मयूर मंगल कार्यालयापर्यंतचा रस्ता, नगरोत्थानमधील विविध रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. खमितकर अपार्टमेंट ते धुम्मा वस्तीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्याच्या कामासाठी रेल्वे विभागाच्या कराराप्रमाणे भरावयाच्या रकमेला मंजुरी देण्यात आली. नागेश वल्याळ यांनी याला आक्षेप घेत रेल्वेकडे असलेली पाणी पुरवठ्याची सात वर्षांपासून थकीत असलेली ७ कोटी ८१ लाख थकबाकी वळती करावी, अशी मागणी केली.
त्यानंतर सभागृह नेते कोठे यांनी जुना कुंभारी रोड, बनशंकरी हॉटेल चौकात पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम आयुक्तांच्या अधिकाऱ्यातून तातडीने घेतले. पण अद्याप हे काम पूर्ण झालेले नसताना आयुक्तांनी हा अधिकार का वापरला, असा सवाल उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपअभियंता विजयकुमार राठोड यांनी नगरोत्थानातील रस्त्यांच्या कामात पाईपलाईन आल्याने हे काम घ्यावे लागले, असा खुलासा केला. त्यावर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी खास अधिकार वापरून अशी किती कामे केली, असा सवाल केला. त्यावर पाणी पुरवठ्याची १९, ड्रेनेजची २ कामे झाल्याचा प्रशासनाने खुलासा केला. दिलीप कोल्हे, संजय हेमगड्डी यांनी प्राणी संग्रहालयाजवळील जागेला कुंपणाचे काम अशाच पद्धतीने झाल्याचा आरोप केला. आनंद चंदनशिवे यांनी खुलासा करताना नागरिकांची गरज म्हणून गुडेवारांनी कामे केली. प्राणी संग्रहालयाजवळील जागेतून मनपाचे ३00 कोटी वाचले. न्यायालयाच्या आदेशान्वये कुंपणाचे काम केले, असे सांगितले.

Web Title: Nomination for municipal walvo bus ticket price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.