ना पाण्याची, ना राहण्याची सुविधा
By Admin | Updated: July 20, 2014 00:35 IST2014-07-19T23:53:49+5:302014-07-20T00:35:43+5:30
उद्धव चाटे, गंगाखेड स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवेत असलेल्या येथील रेल्वेस्थानकावर ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची़ त्यामुळे रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना
ना पाण्याची, ना राहण्याची सुविधा
उद्धव चाटे, गंगाखेड
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवेत असलेल्या येथील रेल्वेस्थानकावर ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची़ त्यामुळे रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना करीतच प्रवास करावा लागतो़ रेल्वे प्रशासनाचे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे़
गंगाखेड तालुका हा मराठवाड्याच्या मध्यभागात वसलेला तालुका आहे़ व्यापारी दृष्टीकोनातून या तालुक्याचे महत्त्व मोठे आहे़ गंगाखेड येथे १९५१ साली रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली़ सुरुवातीच्या काळात मीटरगेज असलेली रेल्वे १९९२ मध्ये ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित झाली़ परंतु, सुविधा मात्र मिळाल्या नाहीत़ स्थानकाच्या निर्मितीपासूनच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागतो़ या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, विश्रामगृह, स्वच्छतागृहदेखील नाही़ त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा रात्रीच्या वेळी स्थानकावर मुक्काम पडला तर त्याला मोठ्या अडचणीतून जावे लागते़ गंगाखेड येथून मुंबई, पुणे, नागपूर, विजयवाडा, हैदराबाद, आदिलाबाद, कोल्हापूर, अमरावती, सिकंदराबाद, निजामाबाद, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी, बेंगलोर आदी गावांना रेल्वेने जोडले आहे़ संत जनाबाई यांचे जन्मस्थळ असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येतात़ व्यापाऱ्यांचा मालही या ठिकाणी रेल्वेद्वारे येतो़ यामुळे या रेल्वे स्थानकाचे महत्त्व मोठे आहे़ सुखकर प्रवास होत असल्याने प्रवासी रेल्वेला प्राधान्य देतात़ परंतु, सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ रेल्वे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष घालून प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे़
२८ रेल्वेगाड्यांची ये-जा
गंगाखेड रेल्वेस्थानकावरून दिवसभरात २८ रेल्वे गाड्यांची ये-जा असते तर ३० ते ३५ मालगाड्या या स्थानकावरून जातात़ गंगाखेड हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे़ परंतु, एकच तिकीट खिडकी सुरू असते़ रेल्वेस्थानकावर सुरक्षा रक्षकाचाही अभाव आहे़ त्यामुळे या ठिकाणी रात्री ८ नंतर थांबण्यास प्रवाशांना असुरक्षित वाटते़
सिग्नलच्या पुढे जाऊन रेल्वे मागे परतली
येथील रेल्वेस्थानकामधून १७ जुलै रोजी सायंकाळी ६़३० च्या सुमारास पूर्णा-परळी ही पॅसेंजर गाडी रवाना झाली होती़ सिग्नलच्या पुढे जाऊन समोर थोडा चढाचा भाग असल्यामुळे इंजीनवर लोड आला व गाडी पुढे जात नसल्याने ती पुन्हा मागे घेण्यात आली़
विशेष म्हणजे समोरच्या बाजूने पंढरपूर-निजामाबाद ही गाडी वडगाव स्टेशन येथे क्रॉसिंगसाठी उभी होती़ दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या असत्या तर अनर्थ झाला असता़
दोन्ही गाड्या एकाच वेळी सुटल्या असा प्रवाशांनी अंदाज काढला़ परंतु, चढाचा भाग असल्यामुळे रेल्वे इंजीन लोड घेऊ शकले नाही, असे गंगाखेडचे स्टेशन मास्टर टी़डी़ प्रसाद यांनी सांगितले़
गंगाखेड रेल्वे स्थानक ६० वर्षांचे जुने असून, सुविधा मात्र नाहीत़
८० हजारांचे उत्पन्न
गंगाखेड रेल्वेस्थानकावरून दररोज दोन हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात़ बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे़ दिवसाकाठी ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न या स्थानकातून रेल्वेला मिळते़ याचाच अर्थ महिन्याकाठी २५ लाखांचे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे़