ना शाळा, ना परीक्षा, ९ लाख ६० हजार विद्यार्थी पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:02 IST2021-06-24T04:02:21+5:302021-06-24T04:02:21+5:30

--- औरंगाबाद : कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना याही वर्षी परीक्षेशिवाय वर्गोन्नतीचा निर्णय झाला, तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना ...

No school, no exam, 9 lakh 60 thousand students pass! | ना शाळा, ना परीक्षा, ९ लाख ६० हजार विद्यार्थी पास !

ना शाळा, ना परीक्षा, ९ लाख ६० हजार विद्यार्थी पास !

---

औरंगाबाद : कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना याही वर्षी परीक्षेशिवाय वर्गोन्नतीचा निर्णय झाला, तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित करण्यात आले. दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द झाल्या. त्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सध्या शाळा स्तरावर सुरू आहे. ना वर्षभर शाळा, ना कुणाची परीक्षा, तरीही जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे ९ लाख ६० हजार ४०३ विद्यार्थी यंदा पास होणार आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा न देता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३३१० शाळांतील ६ लाख ६१ हजार ८०० विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. नववी आणि अकरावीची परीक्षा न झाल्याने तेही बहुतांश विद्यार्थी मूल्यांकनातून पासच होणार असल्याने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ५५५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी पुढच्या वर्गात जातील.

---

जिल्ह्यातील जि.प. शाळा -२१३१

खासगी अनुदानित शाळा -९६५

खासगी विनाअनुदानित शाळा -१३३९

जिल्ह्यातील एकूण शाळा -४५५५

एकूण विद्यार्थी -९,६०,४०३

---

कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?

---

पहिली -८८,३२९

दुसरी -८८,१८९

तिसरी -८८,२०२

चौथी -८९,२११

पाचवी -८७,८६९

सहावी -८६,२०७

सातवी -८५,०४४

आठवी -७९,३६६

नववी -७५,८९१

दहावी -७३,४४२

अकरावी -५५,१७१

बारावी -६३,२१५

---

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे

---

केवळ शाळेत गेले तर शिकता येते, असे राहिले नाही. कोरोनामुळे गाव खेड्यापर्यंत ऑनलाइन शिक्षणाबद्दल कळाले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे सर्वांनाच ऑनलाइन शिकणे शक्य झाले नाही. महामारीत पूर्णपणे शिक्षण खंडित झाले नाही. विज्ञान, इतिहास, भूगोल कंटाळवाणे विषय अधिक रुचीने शिकविता येऊ शकतात. हे शिक्षकांच्याही लक्षात आले, तर विद्यार्थ्यांनाही समजावून घेणे सोपे झाले. एकदा शिक्षकांनी शिकविल्यावर न समजलेला विषय त्याचे रेकाॅर्डिंग उपलब्ध झाल्यास ते परत परत पाहून त्याचे आकलन करून घेता येते.

---

ऑनलाइन शिक्षणाचे तोटे

---

ऑनलाइन शिक्षणात एकतर्फी संवाद झाला. विद्यार्थ्यांचा एकाकीपणा, स्वमग्नता वाढली. डोळे, मानेचे विकार वाढले. विद्यार्थी टेक्नोसॅव्ही झाले. मात्र, मोबाइलच्या आहारी गेले. विद्यार्थ्यांच्या आकलनाचे मोजमाप झाले नाही. शिवाय, तांत्रिक अडचणी, साधने नसलेले विद्यार्थी दुर्लक्षित झाले. त्याच्या शिक्षणासाठी शासकीय पातळीवर फार मोठे काही काम झाले नाही.

---

शहरे आणि खेडेगाव

--

शहरातील ऑनलाइन शिक्षणातील उपस्थिती ४५ टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती, तर ग्रामीण भागात ३० टक्क्यांपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकले. खेड्यांत नेटवर्क, गॅझेट उपलब्धतेचे प्रमाण कमी होते. गट शिक्षण समूह शिक्षणातून त्यांना शिकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सर्वच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले किंवा त्यांचे आकलन झाले असे शिक्षण विभागातूनच अधिकृत कोणीच सांगू शकत नाही, तर मंत्र्यांसह, अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष शिक्षणाला ऑनलाइन शिक्षण पर्याय ठरू शकत नाही, असे सांगताना त्याच्या मर्यादाही शिक्षण तज्ज्ञांनी अधोरेखित केल्या.

Web Title: No school, no exam, 9 lakh 60 thousand students pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.