कोरोना चाचणीनंतर पाच दिवस अहवाल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:02 IST2021-04-07T04:02:17+5:302021-04-07T04:02:17+5:30
औरंगाबाद : कोरोना चाचणीसाठी दररोज किमान दोन ते अडीच हजार संशयित रुग्ण आरटीपीसीआर पद्धतीने लाळेचे नमुने देत आहेत. मागील ...

कोरोना चाचणीनंतर पाच दिवस अहवाल मिळेना
औरंगाबाद : कोरोना चाचणीसाठी दररोज किमान दोन ते अडीच हजार संशयित रुग्ण आरटीपीसीआर पद्धतीने लाळेचे नमुने देत आहेत. मागील पाच दिवसांपासून रुग्णांना त्यांचे अहवाल मिळालेले नाहीत. त्यामुळे सोमवारी दिवसभर नागरिक अहवाल मिळविण्यासाठी महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कक्षाला फोन करीत होते. जवळपास दहा हजार नागरिकांना अहवाल मिळालेले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. सायंकाळी उशिरा एसएमएस सेवा पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला.
कोरोना संसर्ग एक वर्षापासून सुरू आहे. मात्र, आतापर्यंत आरोग्य सेवेतील काही बाजू अतिशय कमकुवत आहेत. पूर्वी नागरिकांना लाळेचे नमुने दिल्यानंतर अहवाल घेण्यासाठी संबंधित केंद्रावर जावे लागत होते. त्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे इतरांना बाधा होऊ शकते म्हणून महापालिकेने एसएमएस सेवा सुरू केली. संशयित रुग्णाच्या मोबाईलवर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असा मेसेज येत होता. एक मेसेज पाठविण्यासाठी महापालिका १५ पैसे खर्च करीत आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही सेवा विकसित करण्यात आली. संबंधित खासगी एजन्सीला महापालिकेने नुकतीच ॲडव्हान्समध्ये ही रक्कम दिली. घाटी रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार संबंधित रुग्णाला रिपोर्ट पाठविण्यात येत होता. मागील पाच दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. आपला रिपोर्ट निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे अद्यापपर्यंत संबंधित रुग्णांना माहीत नाही. ज्या ठिकाणी लाळेचे नमुने दिले त्या केंद्रावर जाऊन रुग्ण अहवाल मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तेथेही निराशा पदरी पडत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या नियंत्रण कक्षाचा क्रमांक मिळवून कर्मचाऱ्यांना सकाळपासून रिपोर्टसाठी तगादा लावणे सुरू केले आहे. सोमवारी दिवसभरात किमान एक हजार नागरिकांनी दूरध्वनीवर रिपोर्टची मागणी केली.
सायंकाळी सेवा सुरू झाली
बल्क मेसेज पाठविण्यासाठी ट्राय.कडून परवानगी घ्यावी लागते. मागील दोन ते तीन दिवस सुट्टी असल्यामुळे ही परवानगी मिळाली नव्हती. सायंकाळपासून मेसेज पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रलंबित रुग्णांचे मॅसेज अगोदर पाठविण्यात येतील. यापुढे अशी यंत्रणा विस्कळीत होणार नाही या संदर्भात एजन्सीला ताकीद देण्यात आली आहे.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.