पाऊस नाही, विक्रीअभावी बी-बियाणे मार्केट ठप्प
By Admin | Updated: July 2, 2014 01:03 IST2014-07-02T00:55:51+5:302014-07-02T01:03:10+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद पावसाने महिनाभर दडी मारल्याने खरिपाचे अर्थकारणच कोलमडले आहे. सुमारे ६५ कोटींचे बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केले.

पाऊस नाही, विक्रीअभावी बी-बियाणे मार्केट ठप्प
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
पावसाने महिनाभर दडी मारल्याने खरिपाचे अर्थकारणच कोलमडले आहे. सुमारे ६५ कोटींचे बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केले; पण पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केलेच नाही. ज्यांनी धाडस केले त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आजघडीला बाजारपेठेत ७० कोटींचे बियाणे थप्पीला लागले असून, गेल्या आठ दिवसांत एकही शेतकरी न फिरकल्याने बी-बियाणे मार्केटमध्ये भयाण शांतता पसरली आहे. मागील वर्षी दुष्काळातही जून महिन्यात सरासरीइतका पाऊस पडला होता. मात्र, हा अपवाद वगळता मागील ७ वर्षांपासून जुलै महिन्यातच पाऊस पडला आहे. जून महिना संपूर्णपणे कोरडा गेला आहे. यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून, पाऊस एक महिना पुढे सरकला आहे. जून महिन्यात पावसाने मोठा ताण दिला आहे. परिणामी, खरिपाचे अर्थकारण यंदाही बिघडले आहे.
निम्मे बी-बियाणे विक्रीविना बाजारात पडून आहे. खरेदीसाठी तर सोडाच; पण बियाणाचे भाव विचारण्यासाठी वितरकांना दिवसातून एकसुद्धा फोन येत नाही. यावरून बाजारपेठेतील गंभीर परिस्थितीची कल्पना येऊ शकते.
बाजारपेठेत खरिपात कपाशीच्या १० ते १२ लाख पाकिटांची दरवर्षी विक्री होते. यात सुमारे ९० ते १०० कोटींची उलाढाल होत असते. १० ते १२ हजार क्विंटल मका बियाणाची विक्री होते, यात १८ ते २० कोटी रुपयांची उलाढाल होते, तर २ ते अडीच हजार क्विंटल बाजरी बियाणे विकले जाते. त्यातून ३ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल होत असते, अशी एकूण १२० ते १२५ कोटी रुपयांची उलाढाल खरिपात होते. वितरकांच्या मते सुमारे ६८ लाख ८० हजार रुपयांचे बियाणे विक्री झाले. मात्र, जून उलटला तरीही पाऊस पडलाच नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीचे धाडस केलेच नाही. पाऊस पडल्यावर बियाणे खरेदी करू असा विचार करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.
२० लाखांचे मूग, उडीद, तूर बियाणे शिल्लक
महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गिरी यांनी सांगितले की, जिल्ह्यासाठी ५१ क्विंटल मूग, ९० क्विंटल उडीद व २०० क्विंटल तूर, ८० क्विंटल हायब्रीड ज्वारी बियाणे उपलब्ध आहे. त्याची एकूण किंमत ३० लाख रुपये असून, त्यातील १० लाख रुपयांचे बियाणे विक्री झाले आहे. येत्या दहा दिवसांत पाऊस आल्यास तूर, ज्वारीचे बियाणे संपूर्ण विक्री होऊ शकते. आता शिल्लक मूग व उडदाचे बियाणे विक्री होणे कठीण आहे.
कन्नड, फुलंब्री, सिल्लोड भागातच बियाणे विक्री
बियाणाचे वितरक जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, निम्म्या बियाणांची विक्री झाली आहे. त्यातील ७० टक्के बियाणे सिल्लोड, फुलंब्री व कन्नड तालुक्यांत, तर पैठण, वैजापूर, गंगापूर या भागात १० ते २० टक्के बियाणे विकले गेले. मध्यंतरी बाजारसावंगी पट्ट्यात एक दिवस जोरदार पाऊस झाल्याने तेथील आसपासच्या १५ ते २० खेड्यांतील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली. मात्र, आज तेथे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तांब्याने पाणी देऊन पीक जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशभरात पहिल्यांदाच एकाच वेळी दुष्काळ
नामांकित बियाणे कंपनीचे निवृत्त सरव्यवस्थापक एच.आर. वर्मा म्हणाले की, मागील ४० वर्षे मी बियाणे उद्योगात कार्यरत होतो. मात्र, यंदा संपूर्ण देशात एकाच वेळी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. एका राज्यात पाऊस पडला नाही, तर बाकीच्या राज्यांत पाऊस पडत असे. गेल्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ होता. मात्र, विदर्भात चांगला पाऊस झाला. यंदा संपूर्ण महाराष्ट्र कोरडाच आहे.
जुलै उजाडला तरीही संपूर्ण देशात ८० टक्के पेरणी झाली नाही. अशी परिस्थिती राहिली तर देशाला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागेल.
आठ दिवसांपासून मार्केट ठप्प
बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, मागील आठ दिवसांपासून बी-बियाणे मार्केट संपूर्णपणे ठप्प झाले आहे. एकही शेतकरी खरेदीसाठी आला नाही. फोनवरूनही कोणी बियाणाच्या दराची चौकशी करत नाही. सोयाबीन बियाणाची कमी उपलब्धता असते; पण सध्या सोयाबीनचे बियाणे विक्रीविना शिल्लक आहे. संपूर्ण अर्थकारणच कोलमडून पडले आहे.