न. पा., जि.प., पं.स.निवडणूक; मतदारांना नाव नोंदवण्याची संधी
By Admin | Updated: May 12, 2016 00:59 IST2016-05-12T00:13:35+5:302016-05-12T00:59:57+5:30
औरंगाबाद : आगामी नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

न. पा., जि.प., पं.स.निवडणूक; मतदारांना नाव नोंदवण्याची संधी
औरंगाबाद : आगामी नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात नवीन मतदारांची नावनोंदणी केली जाणार असून मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयात नावनोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार मार्चपासून हा कार्यक्रम राबविला जात आहे. मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी तहसील कार्यालयात नावनोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येणाऱ्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात असून मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.
मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, यातील दुरुस्ती त्याचबरोबर स्थलांतर आणि मृत व्यक्तींच्या नावांची वगळणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील १२ महिने निवडणुकांचे
राज्यातील सुमारे १९५ नगर परिषदा, २६ जिल्हा परिषदा, २९६ पंचायत समित्या आणि १० महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च २०१७ पूर्वी होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत व बिनचूक करणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविणे हे दोन कार्यक्रम राबविले जाणार आहेत. ज्या मतदारांनी नावनोंदणी अर्ज तहसील कार्यालयात जमा केले असतील त्या मतदारांना २५ जुलै आणि १६ आॅगस्ट २०१६ या २ दिवशी मतदार ओळखपत्राच्या वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी राबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.