कोणीही आगारात या...मुक्तसंचार करा...
By Admin | Updated: July 18, 2014 01:52 IST2014-07-18T00:52:17+5:302014-07-18T01:52:11+5:30
भास्कर लांडे,हिंगोली शहरातील एसटी महामंडळाचे आगार हे येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी २४ तास खुले असल्याचा प्रकार गुरूवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आला.

कोणीही आगारात या...मुक्तसंचार करा...
भास्कर लांडे,हिंगोली
शहरातील एसटी महामंडळाचे आगार हे येणाऱ्या- जाणाऱ्यांसाठी २४ तास खुले असल्याचा प्रकार गुरूवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे समोर आला. एसटी आगार परिसरात अनेकांचा नाहक संचार पहावयास मिळाला. काही महाभाग तर चक्क या परिसराचा प्रात:विधीसाठी वापर करीत असल्याचे आढळून आल्याने दुर्गंधीचा सामना कराव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून संताप तर दिसूनच आला. शिवाय एसटी आगारातील सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
उत्पन्नाच्या बाबतीत हिंगोली आगाराने परभणी विभागात आघाडी घेण्याबरोबरच सुरक्षेच्या व घाणीच्या बाबतीत आगाराचे नाव तेवढेच बदनाम झाले आहे. जिल्ह्याच्या स्थापनेपासून आगाराची दुरवस्था आजतागायत कायम असताना व्यवस्थापकांपासून ते लोकप्रतिनिधीपर्यंत कोणाचेही लक्ष आगाराकडे नाही. परिणामी आगार समस्यांचे माहेरघर बनत असल्याने कर्मचाऱ्यांना घाणीतच काम करावे लागते. याबाबत गुरूवारी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत स्थानकाच्या सुरक्षेपासून ते कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीकक्षापर्यंत सर्व बाबींचे स्टींग आॅपरेशन करण्यात आले. प्रामुख्याने दुपारी १ वाजता सदर प्रतिनिधीने बसस्थानकास भेट दिली असता बसस्थानकात घाणीचे साम्राज्य दिसून आले. गुटखा व मावा खावून भिंती रंगविण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. साफसफाई होत नाही. शिवाय स्थानकाची अनेक महिन्यांपासून रंगरंगोटी केली नसल्याचे दुरवस्थेवरून दिसून आले. प्रवाशांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे नळ कोरडे दिसून आले. परिणामी प्रवाशांना तिन्हीही ऋतूत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बसस्थानकात प्रवाशांसोबत जनावरांचा ठिय्या पहावयास मिळला. गोठ्यासारखा स्थानकाचा वापर अनेक वर्षांपासून होत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या विश्रामकक्षास भेट दिली असता हे विश्रामकक्ष सोयी - सुविधांपासून कोसोमैल दुर असल्याचे दिसून आले. राहण्याच्या खोल्या देखील व्यवस्थीत नसल्याचे सव्वाएक वाजता पहावयास मिळाले. आगारातील ३१२ कर्मचाऱ्यांना जेवनापासून झोपण्यापर्यंत शिवाय आरामासाठी देखील ५ खोल्या उपलब्ध असल्याचे एका चालकाने सांगितले. कर्मचारी विश्रामकक्षात मोडकळीस आलेले पंखे, तुटलेल्या खिडक्या, अंथरून तसेच पांघरण्यासाठी नसलेली व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची वानवा, स्वच्छतेचा अभाव दुपारी सव्वाएक ते दीड वाजेदरम्यान पहावयास मिळाला. तद्नंतर बसस्थानकाच्या पाठीमागे फेरफटका मारला असता मोकळ्या परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र होते. तेथील मोकळ्या जागेत घाणीने कळस गाठल्याचे दिसून आले. आगाराच्या चारीही बाजूंनी पाहणी केली असता पूर्वेकडून आगारास संरक्षण भिंत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे दिवसरात्र केंव्हाही आत येणे शक्य असल्यामुळे काही समाजकंटकांनी या जागेचा वापर प्रात:विधीसाठी सुरू केल्याचे दिसून आले. काही जणांचा या भागात मुक्त संचार दिसून आला. ओला तसेच कोरडा कचरा देखील या जागेत आणून टाकला जात असल्याचे दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंच्या केलेल्या पाहणीत आढळून आले. याबाबतची विचारणा करण्यासाठी दुपारी १.४५ वाजता स्थानक प्रमुखाकडे धाव घेतले असता त्यांचा कक्ष बंद होता. दुसऱ्या मजल्यावर असलेले लेखा विभागातील कर्मचारी मध्यंतर असल्याने भोजनासाठी घरी गेले होते; परंतु शेजारी असलेल्या रोकड विभागाची रूम आणि सोबतच्या आणखी एका रूमचे कुलूप कधीच उघडले जात नसल्याचे दिसून आले. तद्नंतर आगार प्रमुखाकांकडे जाताना १.५० वाजता सुरक्षा रक्षक भगत यांनी सदर प्रतिनिधीची विचारपूस केली. आगारात येणाऱ्या प्रत्येक बसची नोंद घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे आगार प्रमुखांचा कक्ष देखील रिकामा असल्याने प्रतिनिधीने विचारपूस केली असता आगारप्रमुख सोनवणे बैठकीसाठी परजिल्ह्यात गेल्याचे समजले. तेथून परतल्यानंतर १ वाजून ५५ मिनिटांनी आगारातील पोलिस चौकीत तीन विद्यार्थीनी बसल्याचे पहावयास मिळाल्या. थोड्यावेळाने चौकीचे रक्षक शेख निदर्शनास आल्याने त्यांच्यांकडून सुरक्षेसंदर्भात जाणून घेण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत एक पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी राहत असल्याचे सांगितले. रात्रीच्यावेळी पेट्रोलिंंग असल्याचेही शेख म्हणाले; परंतु एकूण सुरक्षेच्या बाबतीत आगार मोकळेच असल्याचे दिसून आले. नागरिकांकडून सहज दुचाकी स्थानकात फिरवून कोठेही लावित असल्याचे चित्र दुपारी २ वाजेपर्यंत पहावयास मिळाले. त्याचप्रणामे एखाद्या बसमध्ये देखील सहज प्रवेश करता येणे शक्य असल्याने बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर असल्याचे दिसून आले. आगारात कोणालाही सहज प्रवेश करता येतो, हे ही यावेळी दिसून आले. त्यामुळे या आगाची सुरक्षा किती तकलादू आहे, याचा प्रत्ययही आला.
संरक्षण भिंत झाली गायब
एसटी आगाराला पडला घाणीचा विळखा
आगारात सुरक्षा व्यवस्था नसल्याने प्रात:विधीसाठी परिसरातील नागरिकांचा होतो मुक्त संचार.
आगारातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांती कक्षाची दयनिय अवस्था.
कर्मचारी विश्रांती कक्ष परिसरात पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा नाही.
आगारामध्ये कोणालाही सहज प्रवेश करता येत असल्याने सुरक्षेसंदर्भात निर्माण झाले प्रश्न.