ड्रेनेजच्या चेंबरमध्ये यापुढे मजूर उतरणार नाहीत, १८ लाखांच्या मशीन आणल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:03 IST2021-04-13T04:03:56+5:302021-04-13T04:03:56+5:30
औरंगाबाद : ड्रेनेज लाइन चोकप झाल्यावर मॅनहोलमधून मजुरांना आत उतरून गाळ काढण्याचे काम करण्यात येत होते. चेंबरमधील वायुमुळे गुदमरून ...

ड्रेनेजच्या चेंबरमध्ये यापुढे मजूर उतरणार नाहीत, १८ लाखांच्या मशीन आणल्या
औरंगाबाद : ड्रेनेज लाइन चोकप झाल्यावर मॅनहोलमधून मजुरांना आत उतरून गाळ काढण्याचे काम करण्यात येत होते. चेंबरमधील वायुमुळे गुदमरून अनेकदा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे. यापुढे शहरातील एकाही ड्रेनेज चेंबरमध्ये मजूर उतरणार नाही, अशी खबरदारी महापालिकेने घेतली आहे. त्यासाठी गुजरात येथील कंपनीकडून अत्याधुनिक मशीन तयार करून घेण्यात आले आहे. सहा लाख रुपये किमतीचे तीन मशीन सध्या शहरात कार्यरतही झाल्या आहेत.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी माहिती दिली की, विसर्जन विहिरीतील गाळ काढताना मुकुंदवाडीत काही मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सलीम अली सरोवर राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. शहरात अधून-मधून अशा घटना घडत होत्या. मनुष्यबळाचा वापर न करता ड्रेनेज चोकअप काढण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान गुजरात येथील अहमदाबाद येथे विकसित झाल्याचे कळाले. यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांचा आम्ही अहमदाबाद येथे जाऊन खात्री करून घेतली. एक नवीन मशीन खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येत होता. महापालिकेकडे कचरा उचलणाऱ्या काही रिक्षा पडून होत्या. त्या रिक्षांवर अत्याधुनिक यंत्रणा बसवून घेण्यात आली. या कामासाठी ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले. अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांनी तीन रिक्षांवर यंत्रणा बसवून दिली. अवघे सहा लाख रुपये महापालिकेला खर्च आला. महापालिकेच्या यांत्रिक विभागाला तीन मशीन प्राप्त झाल्या आहेत. आणखी नवीन सहा मशीन घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
अत्याधुनिक मशीनचे वैशिष्ट्य
ड्रेनेज चेंबर तीस फूट खोल असले तरी आतील सर्व घाण, माती या मशीनने बाहेर काढता येऊ शकते. मशीनचे बकेट आत गेल्यानंतर जेसीबी प्रमाणे सर्व साहित्य जमा करून बाहेर आणते. शहरातील प्रत्येक झोनला तीन दिवसांसाठी हे मशीन देण्यात येत आहे. मागील आठ दिवसांत किमान २५ ठिकाणी देण्याचे चोकअप यशस्वीरीत्या काढण्यात आले आहे.