ना मास्क, ना उपचाराची खात्री; ही तर निलंगा रुग्णालयाची ख्याती
By Admin | Updated: March 13, 2015 00:42 IST2015-03-13T00:31:41+5:302015-03-13T00:42:24+5:30
गोविंद इंगळे , निलंगा निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षाला कायमस्वरूपी डॉक्टर नाही. शिवाय, कक्षात एन-९५ चे मोजकेच मास्क दिले आहेत. रुग्णांनाही मास्क नाहीत.

ना मास्क, ना उपचाराची खात्री; ही तर निलंगा रुग्णालयाची ख्याती
गोविंद इंगळे , निलंगा
निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षाला कायमस्वरूपी डॉक्टर नाही. शिवाय, कक्षात एन-९५ चे मोजकेच मास्क दिले आहेत. रुग्णांनाही मास्क नाहीत. मास्कचा वापर नाममात्रच असून, रुग्ण व नातेवाईकांनी रुमालाने नाका-तोंडाला आवरण घातले होते. सफाई कामगाराव्यतिरिक्त एकही कर्मचारी दिवसभर कक्षाकडे फिरकले नसल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी दिवसभर उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात निरीक्षण केले असता हा प्रकार समोर आला आहे.
सध्या ताप, सर्दी, खोकला, घशातील खवखव अशी स्वाईन फ्लूची लक्षणे असलेले रुग्ण निलंग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत. रुग्णालयात आजपर्यंत २३ संशयित रुग्णांवर उपचार झाले असून, अत्यवस्थ झालेल्या दोन रुग्णांचा लातूर येथे गेल्यानंतर मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एक व्हेन्टीलेटर व पाच प्रोटक्शन कीटस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा कर्मचारी कक्षात आहेत. एन-९५ च्या मास्कची मात्र कमतरता आहे. कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णसेवेला अडथळा येत आहे. एकाही नातेवाईक रुग्णाला मास्क दिलेला नाही. स्वत:जवळचेच कपडे व रुमालाने नाका-तोंडाला बांधलेले रुग्ण कक्षात दिसले. वैद्यकीय अधीक्षक तर या दालनात आठवडा-आठवडाभर फिरकत नाहीत. त्यांना रुग्णालय व स्वाईन फ्लूबाबतची कसलीच माहिती नाही. या कक्षात आतापर्यंत २३ संशयितांनी उपचार घेतले असून, त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कक्ष फक्त दिसायला देखणा आहे. उपचार मात्र नाहीत. रुग्णांची हेळसांडच होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना लातूर किंवा मोठ्या शहरात पैसे घेऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एकूण २३ रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर रुग्णांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले आहे. उपचाराची खात्रीच मिळत नसल्यामुळे थेट लातूरच्याच रुग्णालयाकडे रुग्ण जात आहेत. विशेष म्हणजे निलंगा उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षाकडे वैद्यकीय अधीक्षकांचीच उदासिनता आहे. त्यामुळे हा कक्ष असून नसल्यासारखा आहे.
४यंत्रसामुग्री, औषधी मुबलक असली, तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णसेवेला अडथळा येत आहे, असे निरीक्षणातून दिसले.