ना चारा...ना पाणी....पशुधनाला सांभाळावं कुणी....

By Admin | Updated: December 3, 2014 01:15 IST2014-12-03T00:59:04+5:302014-12-03T01:15:05+5:30

श्याम पुंगळे , राजूर पाणी व चाराटंचाईने त्रस्त पशुपालक जनावरांना बाजारचा रस्ता दाखवून विक्रीस काढत आहे. सध्या दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

No fodder ... no water ... who will care for livestock .... | ना चारा...ना पाणी....पशुधनाला सांभाळावं कुणी....

ना चारा...ना पाणी....पशुधनाला सांभाळावं कुणी....


श्याम पुंगळे , राजूर
पाणी व चाराटंचाईने त्रस्त पशुपालक जनावरांना बाजारचा रस्ता दाखवून विक्रीस काढत आहे. सध्या दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. पशुपालकांना सध्या ना चारा...ना पाणी....पशुधनाला सांभाळणार कोण, असा प्रश्न पडला असून पशुपालक जनावरांना सरळ बाजाराचा रस्ता दाखवत आहे.
राजूर परिसरात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता भयानक होताना दिसत आहे. शेतात कपाशी सुकून गेली असून झाडाला बोेंडे नसल्याने एकाच वेचणीत रानात जळतण दिसून येत आहे. त्यातच पावसाअभावी रबीचा हंगाम हातचा गेला आहे. रबीची पेरणीही होवू शकली नाही. मध्यंतरीच्या तुरळक पावसात केलेली ज्वारीची पेरणी पावसाअभावी उगवू शकली नाही. त्यामुळे किमान जनावरांना चारा होईल, अशी शेतकऱ्यांंची भाबडी आशा फोल ठरली आहे.
सध्या शेतकऱ्यांना स्वत:च्या उदरनिर्वाहाच्या चिंतेबरोबरच वर्षभर रानात साथ देणाऱ्या जनावरांना सांभाळण्याची चिंंता सतावत आहे. त्यांना किमान येणाऱ्या सहा महिन्यापर्यंत पुरेल एवढा चारा साठा नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच भयानक जाणवत आहे. त्यामुळे आगामी काळात स्वत:चे पोट भरायचे का जनावरांचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेती मशागतीच्या कामात सावली प्रमाणे साथ देणाऱ्या बैलांचे चारा पाण्या वाचून डोळयासमोर होणारे हाल पाहण्यापेक्षा विकलेले बरे, असा विचार शेतकरी करीत आहे. त्यामुळे आजच्या बाजारात मोठया प्रमाणात जनावरे विक्रीस आली होती.
आठवडी बाजारात सुमारे पाचशेच्यावर बैलजोड्या, शेळया, गायी, म्हशी विक्रीस आलेल्या होत्या. राजूर भागात दुष्काळाची परिस्थिती सर्वत्र समान असल्याने जनावरे घेण्यास शेतकऱ्यांचा कल कमी प्रमाणात दिसून आला.
दुपारपर्यंत ओसरणारा बैल बाजार आज सांयकाळ पर्यत सुरू असलेला दिसत होता.

Web Title: No fodder ... no water ... who will care for livestock ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.