अतिरिक्त करवाढ नाही

By Admin | Updated: July 25, 2014 00:31 IST2014-07-25T00:04:37+5:302014-07-25T00:31:00+5:30

नांदेड : महापालिकेचा सन २०१४- १५ चा १ हजार ४९ कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांनी अंदाजपत्रकीय विशेष सभेत महापौर अब्दुल सत्तार यांच्याकडे सादर केला़

No extra bills | अतिरिक्त करवाढ नाही

अतिरिक्त करवाढ नाही

नांदेड : महापालिकेचा सन २०१४- १५ चा १ हजार ४९ कोटींचा अर्थसंकल्प गुरूवारी स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांनी अंदाजपत्रकीय विशेष सभेत महापौर अब्दुल सत्तार यांच्याकडे सादर केला़ या अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून आॅगस्टच्या प्रारंभी सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प मंजूर होणार आहे़
महापौर अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या विशेष सभेत सभापती पवळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा अर्थसंकल्प महापालिकेच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत व कोणतीही अतिरिक्त कर वाढ न करता सादर केला आहे़ मूळ अर्थसंकल्पात ४५ कोटींची सुधारणा करून तो सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे़ त्यामुळे पुर्वीच्या फुगीर बजेटच्या अर्थसंकल्पाची परंपरा मोडीत काढणार आहे़ नांदेडकरांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त कराचा बोजा न टाकता मुलभूत सोयी सोबतच शहराचा सर्वांगीण विकास करणे तसेच संपूर्ण शहरात झालेल्या व नियोजित विकास कामांचा देखभाल खर्च या अर्थसंकल्पात समाविष्ट आहे़ यासाठी शहरातील बुद्धीजीवी वर्गाकडून मागविण्यात आलेल्या उत्पन्नवाढीच्या सूचनांचा विचार करण्यात आला आहे़
दरम्यान, विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत यांनी या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली़ त्यानंतर महापौर अब्दुल सत्तार यांनी आठ दिवसानंतर या अर्थसंकल्प मंजुरीसाठी सभा घेण्यात येईल, असे सांगितले़े यावेळी आयुक्त जी़ श्रीकांत, उपमहापौर आनंद चव्हाण उपस्थित होते़
आयुक्तांनी सूचविलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने खालील प्रमाणे शिफारस केली आहे़ १़ शहरातील प्रत्येक व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या नोंदणीचे उद्दिष्ट संबंधित विभागाला देणे़ २़ प्रलंबित गुंठेवारीचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे़ ३़ शहर बसेसमध्ये जाहिराती करून उत्पन्न वाढविणे़ ४़ शहरात एलईडी स्क्रीनवर व्यावसायाकरीता जाहिरात करण्याचा उपक्रम राबविणे़ ५़ नगररचना विभागाने एक पायलट प्रोजेक्ट म्हणून मनपा हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव क्षेत्रातील संलग्न व एकसंघ ३० ते ४० हेक्टर जागा निश्चित करून त्या ठिकाणी टीपी स्कीम राबविणे़ ६़ मनपा मालकीच्या मोकळ्या जागा व इमारती यापुढे बीओटी तत्वावर विकसित न करता मनपाने व्यावसायिकरित्या स्वत: विकसित केल्यास मनपाच्या महसूली उत्पन्नात वाढ होईल़ ७़ अविकसित कौठा, शिवनगर, सांगवी, वाघाळा भागातील तसेच मनपा हद्दीतील नव्याने समाविष्ट झालेल्या अविकसित भागातील मुलभूत सोयीसुविधांसाठी भरीव निधीची तरतूद़ ८़ शहरातील विविध भागातील समाज मंदिरासाठी आवश्यक निधीची तरतूद़
स्थायी समितीने सूचविलेली विकासकामे पुढीलप्रमाणे- १़ लातूररोड ते सिडको रस्त्यावर डॉ़ शंकरराव चव्हाण प्रवेशद्वार अशी भव्य कमान उभारणे़ २़ छत्रपती शाहू महाराज, वीर शिरोमणी महात्मा बसवेश्वर, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे व आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक उभारणे व परिसर सुशोभिकरण तसेच साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर सुशोभिकरण करणे़ ही कामे शासनाच्या विशेष निधीतून न झाल्यास मनपा निधीतून ही कामे करणे़ ३़ गुरूद्वारा लंगर साहिबच्या वतीने शहरात होत असलेल्या वृक्षारोपणासाठी टीगार्ड खरेदी करून पुरवठा करणे व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मनपातर्फे १ लक्ष वृक्षरोपे खरेदी करून देणे़ ४़ शहरातील सर्व स्मशानभुमीचा विकास करणे़ ५़ वसरणी भागात तसेच देगलूरनाका येथे उद्यान विकसित करणे़ ६़ लेबर कॉलनी येथील मोकळ्या जागेवर इमारतीचे बांधकाम करून ग्रंथालय व अभ्यासिका केंद्र स्थापन करणे़ ७़ बाबा शेख फरीद रूग्णालय साईनगर भागात बाह्यरूग्ण विभाग व डेंटल हॉस्पीटल सुरू करणे़
मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्थायी समितीने आवश्यक त्या विकासकामांना दिले प्राधान्य़ निधीची तरतूद व महसूल वाढीचे सूचविलेले उपाय़
स्थायी समितीने सुचविलेल्या तरतुदी- एकत्रित मालमत्ता कर - १६ कोटी १५ लाख ५ हजार, गुंठेवारी विकास - ५ कोटी, सुधारित विकास नियमावली नुसार हार्डशिप प्रिमियम तसेच कंपाऊंडींग फीस - १३ कोटी, स्थानिक संस्था कर - ९५ कोटी़ विकास शुल्क - १३ कोटी, बीओटी - १५ कोटी, तयबाजारी - १ कोटी व इतर २९ कोटी ९५ लाख़
पूर्वीच्या अर्थसंकल्पाची पंरपरा मोडीत काढून यंदा फुगीर बजेट सादर न करता उत्पन्न स्त्रोतांची मर्यादा लक्षात घेवून आमसभेला सादर केले़ मनपाचा प्रत्येक महिन्याचा खर्च ९ कोटी ८९ लाख असून वर्षाचा ११८ कोटी ६८ लाख एवढा आहे़
- उमेश पवळे़, सभापती

Web Title: No extra bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.