सिडकोतील इमारत बांधकामांना नाही अडचण
By Admin | Updated: July 24, 2014 00:40 IST2014-07-24T00:34:46+5:302014-07-24T00:40:38+5:30
औरंगाबाद : सिडकोच्या वाळूज महानगर परिसरातील बांधकामांना सध्या तरी पाण्याची काहीही अडचण नाही.

सिडकोतील इमारत बांधकामांना नाही अडचण
औरंगाबाद : सिडकोच्या वाळूज महानगर परिसरातील बांधकामांना सध्या तरी पाण्याची काहीही अडचण नाही. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्या भागांमध्ये बांधकामांना पाणी मिळेल, अशी शक्यता सिडको सूत्रांनी वर्तविली. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या १० गावांमध्ये बांधकामांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सातारा, देवळाई, वरूड काझी, कुंभेफळ, लाडगाव, सुंदरवाडी, हिवरा, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर या गावांचा समावेश आहे.
वडगाव कोल्हाटी, पंढरपूर या भागांमध्ये बांधकामे वेगाने सुरू आहेत. वाळूज- बजाजनगर हा पट्टा जरी सिडकोच्या अधिपत्याखाली असला तरी वडगाव कोल्हाटी आणि पंढरपूर हे भागदेखील त्याच परिसरात आहेत. वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर, वाळूज भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. वाळूज महानगरमधील प्रकल्प क्रमांक १, २, ४ मध्ये बांधकामे होत आहेत. त्या बांधकामांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो.
सातारा परिसरातील काही भागाला मनपा हद्दीतून पाणी दिले जाते. काही भागाला एमआयडीसीच्या लाईनवरून पाणी मिळते. मात्र ९० टक्के सातारा, देवळाईचा भाग हा हातपंपांवर अवलंबून आहे. पावसाळा लांबल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे.
सिडको प्रशासनाचे मत असे
सिडको प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीकपात आणि बांधकामांवर बंदीचे कुठलेही पत्र अद्याप आलेले नाही. सिडको एमआयडीसीकडून पाणी घेते. सिडकोतील वसाहतींमध्ये सध्या पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा सूत्रांनी केला.