कर्जमाफी नाही, खोटे गुन्हे दाखल केले
By Admin | Updated: June 12, 2017 00:31 IST2017-06-12T00:29:39+5:302017-06-12T00:31:17+5:30
औरंगाबाद :राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

कर्जमाफी नाही, खोटे गुन्हे दाखल केले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र सहकार संस्था कायद्यातील तरतुदीनुसार ५२ सहकारी सोसायट्यांच्या ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जाचे निर्लेखन केलेले आहे. या सोसायट्यांना बँकेने कर्जमाफी दिलेली नसून त्यांच्याकडील कर्जवसुलीसाठी ४९ सोसायट्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत, असे असताना राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
मर्जीतील ५२ सोसायट्यांना बेकायदा ८ कोटी ५२ लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याप्रकरणी अॅड. सदाशिव गायके यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेत जबाब नोंदविल्यानंतर आ. सत्तार यांनी रविवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, संचालक मंडळाने बँकेच्या हितासाठी ५२ सहकारी सोसायट्यांचे ८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज निर्लेखन केले. निर्लेखन म्हणजे कर्जमाफी नाही.
याविषयी तक्रारदार गायके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहकार निबंधक आणि ग्रामीण पोलिसांनीही चौकशी केली होती. शिवाय शहर गुन्हे शाखा दोन वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी करीत आहे; मात्र आताच हा गुन्हा का दाखल करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यशस्वी झाले. यामुळे भाजपने राजकीय हेतूने आम्हाला बदनाम करण्यासाठी ठरवून गुन्हे नोंदविले.
औरंगाबादसह राज्यातील सर्वच बँकांनी अशाप्रकारे बुडीत सोसायट्यांचे कर्ज निर्लेखन केलेले आहे. असे असताना केवळ औरंगाबादेतच गुन्हे कसे नोंदविले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. औरंगाबादेतील बँकेच्या संचालक ांविरुद्ध ज्या आरोपाखाली गुन्हे नोंदविले, तसेच गुन्हे राज्यातील अन्य जिल्हा सहकारी बँकांच्या संचालक मंडळाविरुद्धही नोंदवावेत, यासाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचे आ. सत्तार म्हणाले.