फुकटचे श्रेय नको - मेटे

By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-13T23:15:44+5:302014-07-14T01:00:28+5:30

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका तर दूरच; पण ज्यांनी विरोध केला तेच आता सत्कार घेत फिरु लागले आहेत.

No credit for free - Mete | फुकटचे श्रेय नको - मेटे

फुकटचे श्रेय नको - मेटे

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका तर दूरच; पण ज्यांनी विरोध केला तेच आता सत्कार घेत फिरु लागले आहेत. आरक्षणाचा लढा कोणी दिला हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे फुकटचे श्रेय घेऊ नका... अशा शब्दांत शिवसंग्रामचे अध्यक्ष व आ. विनायक मेटे यांनी नाव न घेता पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला.
शिवसंग्रामच्या वतीने रविवारी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठा आरक्षण आभार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. पंकजा मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. बदामराव पंडित, माजी आ. राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, तानाजी शिंदे, जि.प. सदस्य डॉ. शालिनी कराड, बालासाहेब दोडतले, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, राजेंद्र मस्के यांची उपस्थिती होती.
आ. मेटे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे झुंजावे लागले. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारला जनतेने नाकारले. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. गोपीनाथराव मुंडे यांनी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. आरक्षण मिळाल्याचे पहायला ते हवे होते अशी भावना मेटे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला स्वतंत्र प्रर्वगात आरक्षण मिळाले आहे ते ओबीसीत मिळाले असते तर केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा झाला असता. आता केंद्रातील आरक्षणाचाही लाभ मिळावा, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता संघर्ष करावा लागणार असल्याचे मेटे म्हणाले.
आघाडी सरकारने शिवस्मारकाचा प्रश्न जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता मिळवता मग त्यांचे स्मारक का उभारत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसंग्राम आता राजकीय पक्ष
शिवसंग्राम आतापर्यंत सामाजिक संघटना म्हणून काम करत होती. आता महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्राम काम करणार आहे. शिवसंग्राम या नावाने राजकीय पक्षासाठी रजिस्ट्रेशन केले असून लवकरच त्याला मान्यता मिळेल असेही ते म्हणाले.
महायुतीचेच सहाही आमदार
निवडून आणू
लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला;पण विरोध करणारेच उताणे पडले. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सहाही आमदार विधानसभेत पाठवून मुंडेंना खरी श्रद्धांजली अर्पण करा, अशी भावनिक साद मेटे यांनी घातली.
यावेळी त्यांनी आता आतून एक, बाहेरुन एक काही नाही़ जे करायचे ते उघडपणे, असे सांगून शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे नाव घेत हातात हात घालून लढाई लढू, असे म्हटले़ मराठा-वंजारा वाद संपला पाहिजे़ हा वाद पेटविणाऱ्यांना ओळखा, असे ते म्हणाले़
यावेळी आ़ पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका गोपीनाथराव मुंडे यांनी घेतली होती़ आरक्षणामुळे समाजाच्या विकासाला गती येईल़ धनगर आरक्षणाबरोबरच गोरगरिबांच्या हितासाठी आता लढा देणार असल्याचे त्या म्हणाल्या़ जिल्ह्याच्या रेल्वेसाठी पुरवणी बजेटमध्ये जास्तीत जास्त निधीची मागणी करणार आहे़ महादेव जानकर, तानाजी शिंदे, राजेंद्र मस्के, माजी आ़ जगताप, जनार्दन तुपे, आ़ बदामराव पंडित, डॉ़ रमेश पानसंबळ यांची भाषणे झाली़ आऱ टी़ देशमुख, दिलीप गोरे, सुहास पाटील, आनंद जाधव, सर्जेराव तांदळे, रामहरी मेटे, नितीन कोटेचा, रमेश पोकळे, सचिन कोटूळे उपस्थित होते़
(प्रतिनिधी)
गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणीने गहिवरले सभागृह
महादेव जानकर यांनी आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला़ आरक्षण देण्यास कोणी हात धरला होता की पेनाची शाई संपली होती असे ते म्हणाले़
जानकर यांचे भाषण सुरु असताना आ़ पंकजा मुंडे सभागृहात आल्या़ जानकर यांनी आपल्या भाषणात गोपीनाथराव मुंडे यांचा उल्लेख करताच आ़ पंकजा यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले़ यावेळी संपूर्ण सभागृह मुंडेंच्या आठवणींनी गहिवरले़
महायुतीचे सहा आमदार निवडून आणा असे मेटेंनी म्हणताच बदामराव पंडित यांचे काय ? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला़ यावर आ़ पंडितांनी स्मितहास्य केले़

Web Title: No credit for free - Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.