मनपा शिक्षिकेची आत्महत्या

By Admin | Updated: July 4, 2014 01:09 IST2014-07-04T01:03:23+5:302014-07-04T01:09:18+5:30

औरंगाबाद : हर्सूल महापालिका शाळेतील अविवाहित शिक्षिकेने हर्सूल तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी घडली.

NMC teacher suicides | मनपा शिक्षिकेची आत्महत्या

मनपा शिक्षिकेची आत्महत्या

औरंगाबाद : हर्सूल महापालिका शाळेतील अविवाहित शिक्षिकेने हर्सूल तलावात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी घडली.
दिवसभर शोधकार्य केल्यानंतरही अग्निशामक दल, पोलीस व नातेवाईकांना सदरील शिक्षिका सापडली नव्हती. दुसरीकडे अंधार पडला तरी नातेवाईकांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिक्षिकेचा मृतदहे हर्सूल तलावाच्या पाण्यावर तरंगताना नातेवाईकांच्या नजरेस पडला. त्यांनी बेगमपुरा पोलिसांना त्याबाबत कळविले असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शिक्षिकेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केला.
पल्लवी दादाराव खंडागळे (२६, रा. पिसादेवी परिसर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वीच ती या शाळेवर रुजू झाली होती. हर्सुल तलावाच्या पायथ्याजवळ उभी असलेली तिची तिची स्कूटी (क्र. एमएच-२० डीबी- ५२२१), पर्स व सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. पल्लवी खंडागळे ही शिक्षिका गुरुवारी सकाळी ६.३० वाजता शाळेत जाते असे सांगून घरातून स्कूटी घेऊन निघाली. मात्र, ती शाळेत न जाता हर्सूल तलाव परिसरात गेली. तेथे तिने हर्सूल तलावाच्या गेटसमोरील उद्यानाजवळ आपली स्कूटी उभी केली.
तिने मोबाईलवरून खिल्लारे या नातेवाईकास फोन केला व मी हर्सूल तलावात आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. खिल्लारे यांनी तिची बरीच समजूत काढली; पण तिने अचानक मोबाईल स्वीचआॅफ केला. तो मोबाईल तिने पर्समध्ये ठेवून पर्स स्कूटीच्या हँडलला अडकवली. हँडललॉक केल्यानंतर तिने ती किल्लीही पर्समध्ये ठेवून दिली.
दरम्यान, खिल्लारे यांनी ही घटना तिच्या आईला कळविली. याशिवाय दीड तास झाला तरी पल्लवी खंडागळे अजून शाळेत का आली नाही, म्हणून एका शिक्षिकेनेही तिच्या आईकडे मोबाईलवरून विचारणा केली. त्यानुसार तिची आई व नातेवाईकांनी हर्सूल तलाव गाठून पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत कळविले. पोलीस नियंत्रण कक्षाने तात्काळ सिडको अग्निशामक दलास तलावाकडे पाचारण केले.
आईसोबत झाले होते भांडण
पल्लवी खंडागळे या शिक्षिकेचे आईसोबत भांडण झाले होते. रागाच्या भरात तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तलावाच्या पायथ्याला उद्यानाजवळ त्या शिक्षिकेची हँडल लॉक केलेली स्कूटी, स्कूटीच्या हँडलला अडकवलेली पर्स, पर्समध्ये बंद केलेला मोबाईल व सुसाईड नोट सापडली. त्यात ‘मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे, कोणालाही दोषी धरू नये’ असा लिहिलेला मजकूर आहे.
दिवसभर शोधकार्य
अग्निशमन जवान व बेगमपुरा पोलिसांनी हर्सूल तलाव परिसरात दिवसभर शिक्षिकेचा शोध घेतला. सकाळी तलावाच्या कठड्यावर दोन सुरक्षा जवान गस्त घालत होते. त्यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता ‘सकाळी ६ वाजेपासून आम्ही येथे गस्त घालत आहोत. इकडे कोणीही आलेले नाही’, असे सुरक्षा जवानांनी सांगितले.

Web Title: NMC teacher suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.