मनपा लेखा विभागात तोडफोड; ठेकेदाराविरुद्ध ११ दिवसांनंतर गुन्हा
By Admin | Updated: July 2, 2017 00:43 IST2017-07-02T00:40:57+5:302017-07-02T00:43:58+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या लेखा विभागात १९ जून रोजी करण्यात आलेल्या तोडफोडप्रकरणी अकरा दिवसांनंतर ठेकेदाराविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

मनपा लेखा विभागात तोडफोड; ठेकेदाराविरुद्ध ११ दिवसांनंतर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या लेखा विभागात १९ जून रोजी करण्यात आलेल्या तोडफोडप्रकरणी अकरा दिवसांनंतर ठेकेदाराविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. राजकीय दबावापोटी ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास टाळाटाळ केली जात होती.
सय्यद शहारुख सय्यद मुजाहीद (रा. बुढीलेन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. विकासकामांची देयके ५० कोटींहून अधिक बाकी आहेत. उपलब्ध निधीतून ज्येष्ठता यादीनुसार रमजान ईद डोळ्यासमोर ठेवून लेखा विभागाने प्रत्येक कंत्राटदाराला बिले देण्यासाठी नियोजनही केले होते. माजी नगरसेवक एकबाल मुजाहेद यांचा मुलगा तथा एका नगरसेविकेचा जावई सय्यद शहारुख याचेही महानगरपालिकेकडे बिल थकीत आहे. बिल मिळावे यासाठी १९ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लेखा विभागात तो गेला. तेथील कर्मचाऱ्यांकडे त्याने बिलासंदर्भात विचारणा केली. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वीच कंत्राटदारांची बहुतांश बिले बँकांकडे पाठविण्यात आली आहेत.
दोन दिवसांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असेही कर्मचारी म्हणाला. ठेकेदार शहारुख मात्र काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.