अकरावीच्या प्रवेशापूर्वीच नितीनने घेतला निरोप
By Admin | Updated: June 28, 2017 00:37 IST2017-06-28T00:35:31+5:302017-06-28T00:37:15+5:30
गढी : दहावीत तो चांगले टक्के घेऊन पास झाला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी गढी येथील नवोदय विद्यालयात जात होता. परंतु रस्त्यातच काळाने घाला घातला.

अकरावीच्या प्रवेशापूर्वीच नितीनने घेतला निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गढी : दहावीत तो चांगले टक्के घेऊन पास झाला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी गढी येथील नवोदय विद्यालयात जात होता. परंतु रस्त्यातच काळाने घाला घातला. तो ज्या रिक्षात होता तो रिक्षा उलटल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याच्या आईसह इतर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी घडली.
नितीन अशोक दहिफळे (१७ रा.खंडाळा ता.बीड) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वडिलांचे छत्र हरवलेले असल्याने नितीनच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आई सुलोचना यांच्यावर होती. घरी दीड एकर जमीन असून आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. नितीन त्यांना एकुलता एक होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची नेहमी धडपड होती. दहावीत त्याने ७० टक्के गुण घेतल्याने त्याला अकरावीचा प्रवेश गढी येथील नवोदय विद्यालयात घेण्यासाठी ते मंगळवारी सकाळी गेले होते. एवढ्यात रस्त्यातच त्यांच्यावर काळा घाला घातला. ते ज्या रिक्षात (एमएच २३- सी ७४२९) होते, तो रिक्षा रांजणी फाट्याजवळ उलटला. रिक्षाच्या कडेला असल्यामुळे तो यामध्ये दबला गेला आणि जागीच ठार झाला. तर आई सुलोचना दहिफळे यांच्यासह सुरेखा सवासे (३२ रा.साष्ट पिंपळगाव जि.जालना), नारायण सावंत (६३, रा.रांजणी) व अन्य एक असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.