जिल्हा बँक अध्यक्षपदी आता नितीन पाटीलच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:04 IST2021-04-04T04:04:37+5:302021-04-04T04:04:37+5:30
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटीलच निवडले जाणार याबद्दल कुठलीही शंका राहिलेली नाही. निवडणुकीच्या आधीपासूनच व ...

जिल्हा बँक अध्यक्षपदी आता नितीन पाटीलच!
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटीलच निवडले जाणार याबद्दल कुठलीही शंका राहिलेली नाही.
निवडणुकीच्या आधीपासूनच व निवडणुकीच्या धामधुमीतही हरिभाऊ बागडे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार हे दिग्गज नितीन पाटील हेच शेतकरी विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे सांगत होते. येत्या ५ तारखेला यावर शिक्कामोर्तब होईल असेच वातावरण सध्या तरी आहे. नितीन पाटील यांना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. अध्यक्षपदाची शाश्वती मिळाल्यानंतरच हे घडले असणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची मुळीच गरज नसावी.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे आता बँकेचे संचालक बनलेले आहेत आहेत. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनीही नितीन पाटील हेच बँकेचे अध्यक्ष बनतील, असे जाहीर करून टाकले आहे. नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बँकेतील शिवसेनेच्या संचालकांची संख्या वाढलेली आहे. ती आता ११ पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे कृष्णा पाटील डोणगावकर, महिला संचालक देवयानी डोणगावकर व दुसऱ्या महिला संचालक पार्वता जाधव आता आमच्याबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर असल्याचे दानवे यांनी जाहीर करून टाकले. असे झाले असल्यास देवयानी डोणगावकर यांना उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा ऐकावयास मिळत आहे.
या राजकीय उलथापालथीमध्ये शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे मोठे नुकसान होत आहे. या पॅनलचे अवघे पाच सदस्य निवडून आले होते. त्यापैकी तीन जण हे पॅनल सोडून सत्ताधारी पॅनलबरोबर जात आहेत. किरण पाटील डोणगावकर व जगन्नाथ काळे ते दोघेच शेतकरी सहकार बँक विकास पॅनलमध्ये उरतील.
जावेद पटेल, दिनेशसिंग परदेशी, सुहास शिरसाठ हे तिघे शेतकरी विकास पॅनलमधून निवडून आले आहेत; परंतु ते भाजपचे म्हणून ओळखले जातात. नितीन पाटील हे शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे असताना भाजपच्या या संचालकांची काय भूमिका राहते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. अपक्ष अभिषेक जैस्वाल यांच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता निर्माण झालेली आहे.