विठ्ठल नामाने नर्सी दुमदुमली
By Admin | Updated: July 23, 2014 00:19 IST2014-07-22T23:32:03+5:302014-07-23T00:19:44+5:30
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव संत नामदेवांची जन्मभूमी असलेल्या नर्सी येथे परतवारीच्या निमित्ताने मंगळवारी जवळपास ३ लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
विठ्ठल नामाने नर्सी दुमदुमली
भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव
संत नामदेवांची जन्मभूमी असलेल्या नर्सी येथे परतवारीच्या निमित्ताने मंगळवारी जवळपास ३ लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सकाळी ६.३० वाजता तहसीलदार विद्याचरण कडवकर, वैजनाथ दराडे यांच्या हस्ते महापूजा करून दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
आषाढी एकादशीला असंख्य भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी जातात. हे भाविक आपापल्या गावाकडे परतताना नर्सी येथे संत नामदेवांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी वारकऱ्यांची भावना असल्याने या परतवारीला मोठे महत्व आहे. मंगळवारी सकाळपासूनच गळ्यामध्ये विणा, हातात टाळ, खांद्यावर पताका घेतलेले वारकरी दिंडीच्या समुहाने नर्सी येथे दाखल होण्यास सुरूवात झाली. संत नामदेवांच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांची पायी दिंडी काढली होती. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन मुखात नाम अशा भावनिक अवस्थेत प्रत्येक भाविक नर्सीकडे जमेल तसे येताना दिसत होता. संताच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत, असे अनेक भाविकांनी बोलून दाखविले. शासनाने नर्सी या ठिकाणी कायापालट करावा, असे त्यांनी सांगितले. संत नामदेव मंदिरात मंगळवारी सकाळी ६ वाजता ३० मिनिटांनी खा. राजीव सातव, वैजनाथ दराडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी मंदिर संस्थानचे पदाधिकारी सतीश विडोळकर, विठ्ठलराव वाशिमकर, बाबूराव टेमकर, कवी शिवाजी कऱ्हाळे, भिकुलाल बाहेती, मंडळ अधिकारी मनोहर खंदारे, तलाठी इनामदार, काशिनाथ कुंदर्गे, नर्सी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह परिसरातील मंडळी उपस्थित होती. मंदिर परिसरात परतवारीच्या निमित्ताने छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. त्यामध्ये प्रासादिक साहित्य, कुंकू, हळद, पितळी देव-देवतांचे फोटो, मिठाई, फराळाचे साहित्य, आंबे, केळी आदी वस्तूंची दुकाने थाटली होती.
चोख पोलिस बंदोबस्त
परतवारीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली ३ पोलीस उपअधीक्षक, ७ पोलिस निरीक्षक, ६ सहाय्यक पोलिस निरीक्षक, १३ फौजदार, २३७ कर्मचारी, ३४ महिला कर्मचारी, ६० रिझर्व पोलिस व ६० जलद कार्यवही करणारे जवान असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले.
संस्थानची तयारी
संत नामदेव संस्थानच्या वतीने भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून लाकडी बॅरिकेटस् तयार करण्यात आले होते. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. स्वयंसेवकांचाही मोठा सहभाग होता.
दवाखान्याचे आरोग्य पथक
दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास गोरे यांच्यासह दहातोंडे, भुजबळे, वाढवे यांचे पथक तैनात होते.
भाविकांची मांदियाळी
नर्सी नामदेव हे गाव संत नामदेव महाराजांच्या जन्माने पवित्र झाले आहे. दरवर्षी येथे परतवारी यात्रा भरते.
आषाढीला भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी गेलेले वारकरी व भाविक परत आल्यानंतर नर्सीत येतात. संत नामदेवांच्या दर्शनाशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी भावना आहे.
यंदा संत नामदेवांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने भरणाऱ्या परतवारी उत्सवाची मंदिर संस्थान व पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती.
संस्थानच्या वतीने लाकडी बॅरिकेटस् बांधून सर्वांना दर्शन सुलभतेने घेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मंदिर परिसरात छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. त्यामध्ये प्रासादिक साहित्य, कुंकू, हळद, पितळी देव-देवतांचे फोटो, मिठाई, फराळाचे साहित्य, आंबे, केळी आदी वस्तूंची विक्री झाली.