निर्धार मेळाव्यापूर्वीच खिंडार !
By Admin | Updated: January 30, 2016 00:39 IST2016-01-29T23:59:46+5:302016-01-30T00:39:46+5:30
बीड : सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी संस्थापक कल्याण आखाडे यांच्या कारभारावर टीका करत शनिवारी राजीनामा दिला.

निर्धार मेळाव्यापूर्वीच खिंडार !
बीड : सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी संस्थापक कल्याण आखाडे यांच्या कारभारावर टीका करत शनिवारी राजीनामा दिला. ३१ जानेवारी रोजी पुण्यात संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज निर्धार मेळावा होत आहे. त्याआधीच बंडाचे निशाण फडकल्याने संघटनात्मक ‘आखाडा’ चांगलात ‘ताप’ल्याचे चित्र आहे.
संत सावता महाराज यांच्या नावाने ९ वर्षांपूर्वी येथे सावता परिषदेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. माळी समाजाच्या ‘कल्याणा’चे भांडवल करत संघटनेने राज्यभर कार्यकक्षा रुंदावल्या. मात्र, चार वर्र्षांंपूर्वी संस्थापक आखाडे यांनी भाजपशी जवळीक वाढवली. एवढेच नाही तर संघटनेचा भाजपला जाहीर पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी या भूमिकेवर आक्षेप नोंदविला व संघटनेला सोडचिठ्ठी देत माळी महासंघात प्रवेश केला.
दरम्यान, आता पुन्हा एकदा संघटनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. कार्याध्यक्ष ठकसेन तुपे यांनी ‘संघटनेत सामान्य कार्यकर्त्यांना वाव नाही, स्वाभिमान गहाण ठेवून काम करावे लागते, समाजाचा विश्वासघात होत आहे’ असे आरोप करुन सावता परिषदेला रामराम ठोकत असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. ३१ जानेवारी रोजी पुण्यात दोन मंत्री, अर्धा डझन आमदारांच्या उपस्थितीत संघटेचे अधिवेशन व माळी समाजाचा निर्धार मेळावा होत आहे. त्याचे बॅनर, पोस्टर शहरभर झळकत आहेत. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत कार्याध्यक्षच संघटनेतून बाहेर पडल्याने आखाडेंविरुद्ध असलेली नाराजी उघड झाली आहे.
आणखी काही पदाधिकारी नाराज असून, बंडाच्या पावित्र्यात असल्याचा दावा तुपे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)