नव्वद टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडून ठेंगा
By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:46:02+5:302014-11-10T23:57:03+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या

नव्वद टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडून ठेंगा
उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या. याची दखल घेत कृषी खात्याने २ हजार १९२ शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा केल्यानंतर बहुतांश ठिकाणी बियाणात दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. यात केवळ २०५ शेतकऱ्यांना मदत मिळाली तर १ हजार ९८७ शेतकऱ्यांना कंपन्यानी बियाणे बदलून दिले नाहीत हे विशेष.
जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. नगदी पीक म्हणून सोयाबिन या पिकाकडे पाहिले जाते. यंदाच्या हंगामात उशिराने पावसाने आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला होता. यातच त्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणेही न उगवल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. याबाबत कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने तक्रार निवारण समितीकडून क्षेत्रीय पाहणी करुन न उगवलेल्या बियाणांचा पंचनामा करण्यात आला. या पाहणीवेळी बहुतांश ठिकाणी बियाणातच दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यास नकार दिल्याने कृषी खात्याकडून त्यांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील ६८१ गावातून २ हजार १९२ शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, कृषी खात्याने दिलेल्या आदेशानुसार यातील केवळ १९५ शेतकऱ्यांना संबधित कंपन्यांनी बियाणे बदलून किंवा पैसे दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे अजूनही १ हजार ९८७ शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)