दीड लाख लुटणारा दहा तासांत जेरबंद
By Admin | Updated: December 31, 2016 00:15 IST2016-12-31T00:10:15+5:302016-12-31T00:15:31+5:30
उस्मानाबाद : द्राक्ष व्यापाऱ्याची दीड लाखाची लूट करणाऱ्या चालकास बेंबळी पोलिसांनी १० तासात जेरबंद झाला़

दीड लाख लुटणारा दहा तासांत जेरबंद
उस्मानाबाद : द्राक्ष व्यापाऱ्याची दीड लाखाची लूट करणाऱ्या चालकास बेंबळी पोलिसांनी १० तासात जेरबंद झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा शिवारात घडली होती़ तर आरोपीला वाशी तालुक्यातील पिंपळगाव शिवारातून जेरबंद करण्यात आले़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील द्राक्ष व्यापारी शिवाजी इंगोले यांनी सहकाऱ्यांच्या ओळखीवर तात्पुरत्या स्वरूपात म्हणून संभाजी सुग्रीव भोसले ( रा़ पिंपळगाव ता़वाशी) याला मालवाहतूक टमटमवर चालक म्हणून घेतले होते़ मालवाहतूक टमटममधून द्राक्षांची लातूर येथे विक्री करून ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टमटममधून परतत होते़ टमटम उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा शिवारात आल्यानंतर चालक संभाजी भोसले याने टमटम मालक शिवाजी इंगोले यांना टमटममध्ये पाठीमागे कसलातरी आवाज येत असल्याचे सांगत खाली उतरून पाहण्यास सांगितले़ इंगोले खाली उतरून टमटमच्या पाठीमागे गेल्यानंतर भोसले याने तो टमटम तेथून पळवून नेला़ टमटम तुळजापूर शिवारात सोडून आतील रोख एक लाख ६० हजार रूपये घेऊन त्याने तेथून पळ काढला़
घटनेनंतर व्यापारी शिवाजी इंगोले यांनी बेंबळी पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देऊन फिर्याद दिली़ या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ दीपाली घाडगे, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्याचे सपोनि किरण दांडगे, फौजदार जमदाडे, पोहेकॉ गोरोबा कदम, पोहेकॉ एऩआऱ पिसाळ यांनी आरोपी संभाजी भोसले याला पिंपळगाव शिवारातून घटना घडल्यानंतरच्या दहा तासांतच जेरबंद केले़ तपास कामी स्थागुशाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले़ घटनेनंतर अवघ्या दहा तासांतच आरोपीला जेरबंद करण्यात आल्याने या कामगिरीचे सर्व कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)