इराकमध्ये अडकलेले निलंग्याचे चौैघे अखेर मायभूमीत दाखल !

By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:15:01+5:302014-07-30T00:50:30+5:30

गोविंद इंगळे, निलंगा पैैसे कमविण्याच्या उद्देशाने इराकला गेलेल्या तरुणांची फसवणूक झाली होती.. भारतीय रुपयात २४ हजार पगार देतो म्हणून १८ हजारावर बोळवण.. गुत्तेदाराने पासपोर्ट पळविलेले..

Nilangee bound in Iraq | इराकमध्ये अडकलेले निलंग्याचे चौैघे अखेर मायभूमीत दाखल !

इराकमध्ये अडकलेले निलंग्याचे चौैघे अखेर मायभूमीत दाखल !

गोविंद इंगळे, निलंगा
पैैसे कमविण्याच्या उद्देशाने इराकला गेलेल्या तरुणांची फसवणूक झाली होती.. भारतीय रुपयात २४ हजार पगार देतो म्हणून १८ हजारावर बोळवण.. गुत्तेदाराने पासपोर्ट पळविलेले.. चार महिन्यांपासून पगार थकविलेला आणि खायला दाळ भातावर ठेवलेले.. पगार मागितला की शिव्यांच्या बोनससह लाथाबुक्क्यांचा प्रसाद.. त्यात युध्द पेटले आणि एका अनोळखी गोडावूनमध्ये चाघ्ौांनाही कोंडण्यात आले. बॉम्ब पडल्याच्या आणि बंदुकीच्या आवाजाने लघवीला जायचीही चोरी अशा अवस्थेत दोन महिने जीव मुठीत धरले होते.. एक एक क्षण घरच्यांच्या आठवणीने डोळ्यात पाण्याने डबडबणारा. पण अखेर भारतीय दूतावासाला जाग आली आणि आम्ही मायभूमीत आलो, या भावना आहेत इराकहून परतलेल्या निलंग्यातील पाच तरुणांच्या.
ज्ञानेश्वर प्रताप भोसल, नितीन सुभाष कांबळे (दोघेही रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर) तर बालाजी तानाजी भोसले (रा. हत्तरगा हा़, ता. निलंगा) प्रमोद रघुनाथ सोनवणे (रा. शिरढोण, ता. निंलगा) ही त्या चार तरुणांची नावे आहेत. घरातील दारिद्र्याला कंटाळून हे चौैघे पैैसे कमविण्यासाठी इराकला गेले होते. अंबुलगा येथीलच एजंट रसूल मुल्ला शेख याच्या मदतीने त्यांनी २७ डिसेंबर २०१३ ला मुंबई येथून इराकमधील बसरा या शहरात कामासाठी गेले होते. तिथे अलमनहेल अलनुलिडर को मध्ये हेल्पर म्हणून कामास नेण्यात आले़ या साऱ्यांना महिन्याला ४०० डॉलर (२४०००रुपये) देतो, असे सांगण्यात आले होते. परंतु त्यांना पहिला झटका कामाच्या ठिकाणी पगारीचा बसला. त्यांना केवळ ३०० डॉलर (१८०००) रूपये पगार हातावर टेकविण्यात आला. तो ही फक्त दोन महिनेच. त्यानंतरच्या चार महिन्याचे वेतन अद्यापही त्यांना मिळाले नाही. त्यांचे पासपोर्ट मुगलीस व तौफिक या गुत्तेदारानी जप्त केले. जनावरांसारखे काम करून घ्यायचे आणि खायला मात्र फक्त दाळ-भात दिला जायचा. या अत्याचाराची कहाणी म्हणजे छळछावणीच. कोणी पगार मागितला तर शिवीगाळ, लाथा बुक्क्याने मिळे. खिशात पैैसे नाहीत आणि पासपोर्टही जवळ नसल्याने परतीचे दोर कापलेले. अशी छळछावणीची चार महिने संपली. त्यात इराकमध्ये घनघोर युद्धाला सुरूवात झाली. या साऱ्यांना एका गोडाऊनमध्ये टाकले. कामाहून त्यांचा अधिक छळ या छावणीत सुरू झाला. त्या गोडाऊनमध्ये ना बाथरूम, अांघोळ, जेवणाची कसलीच सोय नव्हती़ एक दिवसाआड थोडेसे दाळ-भात मिळे़ बाहेर गोळीबारी, बंबारी आम्ही आई-वडिलांकडे परत येण्याची शाश्वती संपली़ मोबाईलवरून बोलण्यासाठी पैसेही संपले़ अशा परिस्थितीत एक महिना गेला व २७ जून रोजी भारतीय दूतावासाला फोनवरून सर्व हकीकत सांगितली़ त्यांनीही सुटकेची हमी दिली. त्यानंतरही एक महिना लोटला. आम्ही परत येण्याच्या आशा जवळ-ज़वळ सोडल्या होत्या. परंतु एक महिन्यांनी म्हणजे २८ जुलै रोजी आम्हाला इराक येथील पोलिसांनी बसरा विमानतळावर आणून एका विमानात बसविले. ते विमान त्याच दिवशी रात्री ८़३० वाजता मुंबई विमानतळावर आम्हाला सोडले़ चौघेही भेदरलेल्या अवस्थेत सांगत होते़ (वार्ताहर)
एक महिना घरच्यांशी संपर्क तुटला
युध्दाच्या काळात आम्ही ज्या गोडावूनमध्ये होतो तिथे कशाचीही सोय नव्हती. आमच्याकडच्या मोबाईलमध्ये पैैसेही नव्हते. त्यामुळे आमचा घरच्यांशी संपर्क तुटला होता. आता कसे करावे, कसे गावाकडे जावे हाच विचार आमच्या मनात रात्रंदिवस येत होता. डोके सुन्न व्हायचे. एका जाग्यात बसून विचार करून करून मनोरुग्ण व्हायची वेळ आली होती. आम्ही हसलोही नाही. आमच्या चेहऱ्यावर फक्त भय होते. सुटका होईल,ही आशा होती. परंतु मनात एकदम निराशा आली की आम्ही एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करायचो.
कधी कधी धीर यायचाच नाही तेव्हा रडलोही, असे या चौैघांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पण अखेर हिम्मत करून भारतीय दूतावासाशी आमचे बोलणे झाले. तेथील अधिकाऱ्यांनी आमची सुटका होईल हा विश्वास दिला आणि आमची सुटका झाली, असेही ते म्हणाले.
जगलो हे परमेश्वराचे उपकारच : बालाजी भोसले
इराकमध्ये अडकलेला बालाजी भोसले म्हणतो की इराकमधूनू परत आलो हे परमेश्वराचे खुप मोठे आभार आहेत. मला आई, वडील, भाऊ व एक विवाहित बहीण असून मी स्वत: अविवाहित आहे़ भरपूर पैसे कमवून आल्यानंतर गावी थाटामटात लग्न करण्याचा मानस होता म्हणून परदेशात गेलो होतो. परंतु कामाच्या ठिकाणी झालेला छळ शब्दात सांगू शकत नाही. युध्दात तर जगू असे वाटतच नव्हते. परमेश्वराचे आभारच.
पासपोर्ट मिळेल असे वाटत नव्हते : नितीन कांबळे
वडिलांचे अकाली निधन झाले. एक भाऊ दुबईला पैसे कमाविण्यासाठी गेला म्हणून मी ही घरासाठी काहीतरी करावे, असे मनात धरून विधवा आई व पत्नीला घरी ठेवून गेलो होतो. गुत्तेदाराने पासपोर्ट नेल्यानंतर तो परत मिळेल असे वाटलेच नाही. पण खऱ्या अर्थाने आमची सुटका युध्दामुळे झाली. भारतीय दूतवासाला आम्ही फोन करून माहिती दिली आणि त्यांनी आमची सुटका केली. त्यांचे खुप खुप आभार, अशा शब्दात नितीन याने आपल्या भावना मांडल्या.
प्रमोद म्हणतो, मागच्या जन्माचे पुण्यच तारले..
आपल्या भावना मांडताना प्रमोद गहिवरला़ मुंबईच्या एअरपोर्टवर उतरलो आणि माझ्या मनाचा बांध फुटला. भारताची हवा खाल्ल्यावर जो आनंद माझ्या मनाला झाला तो शब्दात सांगू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रमोद सोनवणे याने दिल्या.
डोळ्यासमोर दिसायची आई : ज्ञानेश्वर भोसले
ज्ञानेश्वर भोसले आपल्या भावना मांडताना म्हणाला, आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ यांना सोडून गेलेला ज्ञानेश्वर भोसले म्हणतो, मी तर दोन दोन दिवस संडासला जात नव्हतो. एकतर खायलाच मिळत नव्हते. दाळ भात कुठे जात होता कळत नव्हते. दुसरीकडे युध्द सुरू झाल्यानंतर गोळी, बॉम्बचा आवाज ऐकला तर पोटात गोळा यायचा. माझ्या डोळ्यासमोर तर सारखी आई दिसायची.

Web Title: Nilangee bound in Iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.