रात्रवस्ती तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!

By Admin | Updated: July 12, 2015 00:41 IST2015-07-12T00:41:04+5:302015-07-12T00:41:04+5:30

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जिल्हाभरात रात्रवस्ती तपासणी मोहीम राबविण्यात आली़

Nightly inspection report bouquet! | रात्रवस्ती तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!

रात्रवस्ती तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!


उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जिल्हाभरात रात्रवस्ती तपासणी मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेदरम्यान उमरगा आगारातील दोन वाहक मुक्कामस्थळी नसणे व एकाकडे १११ रूपये कमी असल्याचा प्रकार समोर आला होता़ मोहीम राबवून जवळपास नऊ दिवसांचा कालावधी लोटत आला तरी अद्याप ‘त्या’ वाहकांचा विभागीय कार्यालयाकडे अहवाल आलेला नाही़ या प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाई गुलदस्त्यात अडकली आहे़
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात व रात्री मुक्कामी बस असलेल्या गावात वाहक-चालक राहतात का यासह इतर कारणांचा शोध घेण्यासाठी २ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रवस्ती तपासणी मोहीम राबविण्यात आली़ उस्मानाबाद जिल्ह्यात १९ पथकाची निर्मिती करून ७८ ठिकाणांची तपासणी करण्यात आली़ या पथकाने चालक, वाहकाने मद्यार्क सेवन केले आहे का, वाहकाजवळ असलेली शासकीय, खासगी रक्कम, वाहक- चालकाचा गणवेश, वाहन परवाना, प्रवाशांच्या तक्रारी, मागण्या, वाहक-चालकांच्या मुक्कामाची सोय, आदी बाबींची प्रामुख्याने तपासणी करणे आवश्यक होते़ मात्र, प्रवाशांच्या तक्रारींची नोंद करण्यात आल्याचे दिसत नाही़
रात्री उशिर झाल्याने प्रवाशांच्या तक्रारी नोंदवू शकले नसल्याचे सांगण्यात आले होते़ तर उमरगा आगारांतर्गत असलेल्या पथकाला मुक्कामी बसेस पैकी दोन ठिकाणचे वाहक मुक्कामी स्थळावर दिसून आले नाहीत़ शिवाय एका वाहकाकडे १११ रूपयांची रक्कम कमी असल्याचे दिसून आले होते़ संबंधित वाहकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते़ राज्य परिवहन महामंडळाकडून अचानकपणे ही मोहीम राबविण्यात आल्याने कामचुकार वाहक-चालकांचे धाबे दणाणले होते़
परिवहन महामंडळाने वेगवेगळ्या उद्देशाने ही मोहीम राबविली होती़ मात्र, मोहीम राबवून साधारणत: नऊ दिवसांचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही उमरगा आगाराकडून विभागीय कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झालेला नाही़ अहवालच न आल्याने संबंधितांची चौकशी व त्यानंतर समोर येणाऱ्या निष्कर्षानंतरची कारवाई गुलदस्त्यात अडकली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Nightly inspection report bouquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.