निर्धार मेळाव्यातच रंगला कलगीतुरा
By Admin | Updated: July 26, 2014 01:07 IST2014-07-26T00:48:14+5:302014-07-26T01:07:58+5:30
नांदेड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यातच

निर्धार मेळाव्यातच रंगला कलगीतुरा
नांदेड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यातच लोहा - कंधार मतदारसंघावर आ़ शंकरअण्णा धोंडगे व माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा ठोकत उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसमोरच आपण कसे योग्य उमेदवार आहोत, हे ठासून सांगितले़ तर आ़ प्रदीप नाईक यांनी अशा भानगडीमुळेच मी नांदेडात भाषण करीत नसल्याचा टोला लगाविला़
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी स्वबळाची भाषा केली़ त्यानंतर सर्वच पदाधिकारी व आमदारांनी त्यांचीच रि ओढली़ आघाडी झाल्यास राष्ट्रवादीचेच मोठे नुकसान होणार असून स्थानिक काँग्रेस नेते आपल्याच विरोधात प्रचार करुन विरोधकांची भूमिका निभावत असल्याचेही सर्वांनी ठासून सांगितले़ तसेच नऊ मतदारसंघापैकी किमान ४ ते ५ जागा मागून घ्याव्यात अशी मागणीही केली़ यावेळी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांनी आघाडीचा फायदा अन तोटा मोठा असल्याचे सांगितले़ आघाडीचा धर्म दोन्ही बाजूने पाळला जात नसल्याचेही ते म्हणाले़ तसेच राष्ट्रवादीत गट-तट असल्याचे मान्य करीत कंधार-लोह्यामध्ये आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क सुरु केला असून सर्वात जास्त निधी खेचून आणण्यात आपल्याला यश मिळाल्याचे सांगत कंधार - लोहा मतदारसंघावर आपला दावा निश्चित केला़
त्यानंतर भाषणासाठी आलेल्या माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी मी कोणाची कॉपी करत नाही, परंतु कोणी माझी कॉपी करत असेल तर काय म्हणाव? मी तालुक्यात २ हजार कोटी रुपये आणले़ त्यातून अनेक प्रकल्प मार्गी लागले़ त्यामुळे कंधार - लोह्याची जागा लागलीच पाहिजे असे म्हणत टीका केली.
माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी वाटाघाटीच्या टेबलावरील लढाईत शरद पवार यांचा हातखंडा असल्याचे सांगत मतभेद विसरुन कामाला लागण्याचे आवाहन केले़
कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर आ़ प्रदीप नाईक बोलण्यास उभे राहिले़ परंतु त्यांनी या सर्वांवर कुरघोडी करीत अशा भानगडीमुळेच मी नांदेडात बोलण्याचे टाळतो असे सांगितले़ राष्ट्रवादीला ६ जागांची गरज आहे़ परंतु संधीसाठीच भानगडी होत असल्याचा खुलासाही त्यांनी केला़
दरम्यान, मेळाव्याला माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात येत होती. पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पाटील आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत़ त्यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचे आवर्जुन सांगितले़ (प्रतिनिधी)