दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T00:54:11+5:302014-11-26T01:11:33+5:30
औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या

दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित
औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या नामुष्कीला विद्यापीठ प्रशासनाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सहायक कुलसचिव पदासाठी ४ डिसेंबर रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी होणार असून त्यानंतर मग मुलाखतीचा दिवस ठरविला जाईल.
सोमवारी उपकुलसचिव पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचे छाननी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिवपदासाठी मुलाखती आयोजित केल्या. तत्पूर्वी, छाननी समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. तेव्हा अनेक उमेदवारांच्या कागदपत्रांद्वारे काही तांत्रिक बाबी समोर आल्या. याचा अर्थ ते उमेदवार अपात्र नव्हते. विद्यापीठ प्रशासनाने सहायक कुलसचिव पदासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये अनेक संदिग्धता होत्या. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज केले होते. संबंधित उमेदवारांचे शैक्षणिक, अनुभव व अन्य प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणीसाठी आज मंगळवारी पुरेसा अवधी नसल्यामुळे छाननी समितीच्या निर्णयानंतर कुलगुरूंनी आजच्या मुलाखती स्थगित केल्या. ४ डिसेंबर रोजी सहायक कुलसचिव पदाच्या उमेदवारांची छाननी समितीसमोर कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर मुलाखतीची तारीख निश्चित केली जाणार आहे.
छाननी समितीसमोर हजर झालेल्या खुल्या प्रवर्गातील ४० पेक्षा जास्त व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील ११ उमेदवारांच्या कागदपत्रांची आज सकाळी तपासणी सुरू झाली. तेव्हा दुसरीकडे
कुलसचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखत समितीचे
सदस्य उमेदवारांच्या प्रतीक्षेत बसले होते.
दुपारनंतर त्यांना आजच्या मुलाखती स्थगित केल्याचा निरोप मिळाला. सलग दोन दिवस विद्यापीठात मुलाखतीची संपूर्ण यंत्रणा सज्ज असताना पात्र- अपात्रेवरून अखेर मुलाखती रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. ४
मुलाखत समितीचे सदस्य तथा राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे काही सूचना मांडल्या. विद्यापीठाची नामुष्की टाळण्यासाठी यापुढे कोणत्याही भरतीसाठी जाहिरात देताना त्यामध्ये उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी स्पष्ट उल्लेख असावा. ४
जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहू नये. यामुळे विद्यापीठाचा वेळ व पैसा वाचेल. बदनामी होणार नाही. शिवाय, उमेदवारांचाही मानसिक त्रास वाचेल.४
प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारावर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आज तीव्र नापसंती व्यक्त केली. यापुढे गांभीर्यपूर्वक काम करण्याच्या सूचना कुलगुरूंनी प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या.