पुढील आंदोलन उत्तर नगरचे ‘दूध बंद’
By Admin | Updated: November 28, 2014 01:17 IST2014-11-28T01:02:44+5:302014-11-28T01:17:13+5:30
औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर

पुढील आंदोलन उत्तर नगरचे ‘दूध बंद’
औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यापुढील आंदोलन उत्तर नगर जिल्ह्यातील ‘दूध बंद’ असून जनतेने नगरचे दूध घेणे बंद करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी केले आहे.
आजच्या निदर्शनात सतनामसिंग गुलाटी, मंगल ठोंबरे, राहुल मगरे, दत्तू पवार, संजय नागरे, गणेश वडकर, डॉ. विजय डक, सुशील भिसे, विजय काकडे, कल्याण देहाडे, खमरखान, सीताराम सपकाळ, संतोष पवार, संतोष चौधरी, अशोक चक्रे, अशोक पवार आदींसह गेवराई, पैठण व औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. यासंदर्भात जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, जायकवाडी धरणामध्ये समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय शासकीय स्तरावर दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता होती. त्यामुळे मराठवाड्यास त्यांच्या हक्काचे पाणी मिळूच न देण्याचा चंग उत्तर नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांनी बांधला आहे. गतवर्षी कोल्हे- पिचड विरोध करीत होते. आता विखे विरोध करीत आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ आली की न्यायालयीन प्रकियेत अडकवून टाकण्याचे धोरण साखरसम्राटांनी अवलंबिले आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मदत करण्याऐवजी स्वत:च्या पोळीवर तूप ओढण्याच्या धोरणाविरोधात आमची ही निदर्शने आहेत.
जायकवाडीत वरील धरणांतून २७ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. तरीही मुख्यमंत्री न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून २२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, हे ओळखून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवून टाकून पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबविण्याचे धोरण उत्तर नगरच्या साखरसम्राटांनी स्वीकारल्याचे दिसून येते. कर्जत, जामखेड, नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व शेवगाव हे तालुके दुष्काळी आहेत. त्यांच्याबद्दल या मंडळींनी कधी सहानुभूती दाखविलेली नाही. \
जायकवाडी धरणातून फक्त मराठवाड्यासाठी पाणी मिळत नाही, तर शेवगाव व नेवासा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. तेथील पाच साखर कारखाने जायकवाडीच्याच पाण्यावर अवलंबून आहेत.
४ तसेच शंभर गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा जायकवाडीतूनच केला जातो, याकडेही जयाजी सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले आहे. दूध बंद आंदोलनाबद्दलही त्यांनी सूतोवाच केले.