नवीन वाहनांमुळे अधिक चपळतेने काम करतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:02 IST2021-06-29T04:02:56+5:302021-06-29T04:02:56+5:30
औरंगाबाद : शहर पोलीस दलाला १२ चारचाकी वाहने आणि ७४ दुचाकी सोमवारी देण्यात आल्या. नवीन वाहने मिळाल्याने गुन्हेगारांपेक्षा ...

नवीन वाहनांमुळे अधिक चपळतेने काम करतील
औरंगाबाद : शहर पोलीस दलाला १२ चारचाकी वाहने आणि ७४ दुचाकी सोमवारी देण्यात आल्या. नवीन वाहने मिळाल्याने गुन्हेगारांपेक्षा चपळतेने घटनास्थळी पोलीस पोहोचतील, अशी अपेक्षा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून शहर पोलिसांनी खरेदी केलेल्या ७४ दुचाकींचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते २७ जून रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले की, राज्यातील पोलीस दलाचे आधुनिकीकरण सुरू आहे. याकरिता राज्यातील शहर आणि ग्रामीण पोलिसांना नवीन वाहने देण्यात येत आहेत. ११२ क्रमांक डायलअंतर्गत १२ चारचाकी वाहने यापूर्वीच प्रदान करण्यात आली, तसेच डीपीसीतून देण्यात आलेल्या ७४ दुचाकींची आज भर पडली. अनेक अडचणींचा सामना करीत पोलीस काम करतात. असे असताना पोलीस उशिरा पोहोचतात, असे चित्रपटातून दाखवून पोलिसांची टिंगळटवाळी केली जाते. आधुनिक पोलिसिंगमुळे आणि चित्रपटांतून होणारी पोलिसांची अवहेलना आता कायमची बंद होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पोलीस आयुक्तांनी प्रास्ताविक करताना जिल्हा नियोजन समितीतून मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांसह, समिती सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त विश्वंभर गोल्डे यांनी केले. कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सर्व सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.
चौकट
दुचाकींला पिवळा दिवा आणि सायरन
शहर पोलिसांना देण्यात आलेल्या ७४ दुचाकींना पोलिसांच्या वाहनांवर असतो तसा पिवळा दिवा आणि सायरन बसविण्यात आले आहे. या सर्व दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यांतील बीट हवालदारांना गस्तीसाठी दिल्या जातील.
--------------