माहुरात नवीन मतदार नावनोंदणीस सुरुवात
By Admin | Updated: July 7, 2016 23:41 IST2016-07-07T23:39:09+5:302016-07-07T23:41:45+5:30
श्रीक्षेत्र माहूर : शहरात येत्या डिसेंबर महिन्यात नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत़ या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली

माहुरात नवीन मतदार नावनोंदणीस सुरुवात
श्रीक्षेत्र माहूर : शहरात येत्या डिसेंबर महिन्यात नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत़ या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून ७ जुलै रोजी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार नोंदणी जनजागरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली़
नगर पंचायत प्रांगणात झालेल्या बैठकीत कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात निवडणूक विभागामार्फत आलेल्या सूचना व माहितीचे वाचन उपस्थितांसमोर केले़ ज्या युवक-युवतींचे १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी तहसील कार्यालय माहूर येथे आवश्यक पुरावे सादर करून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करून घ्यावी़ नवीन रहिवाशांनी सुद्धा वरील तारखेच्या आधीचे रहिवासाचे पुरावे देवून नावनोंदणी करावी़ १० सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ यासाठी आधीच्या चार प्रभागांचे १७ वार्ड तयार करण्यात आले असून याची प्रसिद्धीही करण्यात आली आहे़
शहराची लोकसंख्या ११ हजार १६४ असून मतदारसंख्या ८२११ आहे़ २०११ नुसार असलेल्या या मतदारयादीत आणखी किती मतदारांची भर पडते हे नवीन मतदारयादी आल्यावरच कळणार आहे़ तूर्तास शहरात प्रभाग रचना झाल्यापासून २५ ते ३० मतदार असलेल्या कुटुंबातील पुढारी राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना दिसत आहेत़ प्रत्येक पक्षाकडे एका जागेसाठी किमान १० इच्छुकांच्या नावे कागद काळा करीत आहेत़ (वार्ताहर)