नवीन बसबांधणीचा पुन्हा श्रीगणेशा
By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:14:16+5:302014-09-08T00:35:16+5:30
शनिवारी काही चेसीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच नवीन बसची निर्मिती सुरू होणार आहे.

नवीन बसबांधणीचा पुन्हा श्रीगणेशा
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या दहा महिन्यांपासून ‘चेसीस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद होती; परंतु कार्यशाळेस नवीन ‘चेसीस’चा पुरवठा सुरू झाला असून, शनिवारी काही चेसीस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच नवीन बसची निर्मिती सुरू होणार आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा येथील कार्यशाळेत नवीन बसची निर्मिती केली जाते. तयार झालेल्या नव्या बस राज्यभरात पाठविण्यात येतात; परंतु गेल्या वर्षभरापासून चेसीसचा पुरवठा बंद राहिल्याने चिकलठाणा कार्यशाळेत केवळ जुन्या बसच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यामुळे उन्हाळी हंगामात आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी देण्यात येणाऱ्या नवीन बस यावेळी देण्यात खंड पडला; परंतु आता पुन्हा या ठिकाणी बसची निर्मिती पूर्ववत सुरू होणार आहे. चेसीसचा पुरवठा न झाल्याने गेल्या वर्षभरापासून अनेक मार्गांवर खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे; परंतु आता लवकर नवीन बसबांधणी सुरू होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर नवीन बस देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नवीन बसमुळे आगामी कालावधीत विविध मार्गांनी एस.टी. प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.