जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

By विकास राऊत | Published: March 21, 2024 12:24 PM2024-03-21T12:24:36+5:302024-03-21T12:27:01+5:30

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली.

new pipeline and road work slow down; It took the Collector 3 hours to reach Paithan | जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण आणि नाथषष्ठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पैठणला पोहोचण्यासाठी तीन तास लागले. या रस्त्यावरील नवीन जलवाहिनी आणि रस्ता रुंदीकरणाचे चौपदरीकरणाचे काम मनमानीपणे सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. जलवाहिनी आणि रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पॉटवर बोलावून घेतले. त्या प्रतिनिधींना खडे बोल सुनावले. दोन दिवसांत कामात सुधारणा न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

पैठण येेथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून पैठणकडे निघाला. पैठण रस्त्यालगत शहर पाणीपुरवठा योजनेच्या नवीन जलवाहिनीचे आणि छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सोबतच सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. रस्त्याच्या कामासाठी वळण असल्याचे फलक नाहीत. जलवाहिनीसाठी कुठेही खड्डे खोदलेले आहेत. हा सगळा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिला. हे काम करताना काेणतेही नियोजन नसल्याचेही निदर्शनास आले. शहर पाणीपुरवठा योजनेचे जलवाहिनीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, तर पैठण रस्ता रुंदीकरणासाठी जागोजागी खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कोणत्याच ठिकाणी वाहतूक सुरळीत करताना पोलिस नाहीत, कंत्राटदाराचे कर्मचारी नाहीत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून, त्यामुळे दुचाकी, तीनचाकीतून जाणाऱ्यांचे हाल होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अपघात, जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार रोज
रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक बेशिस्त झालेली आहे, तसेच खोदकामामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच रस्त्याच्या कामामुळे डायव्हर्जन न दिल्यामुळे रोज अपघात होत आहेत. या सगळ्या प्रकाराकडे कोण पाहणार, असा प्रश्न आहे.

गुन्हा दाखल करण्याचा इशारा
पुढील आठवड्यात पैठण येथे नाथषष्ठीचा उत्सव असून, लाखो भाविक या रस्त्यावरून ये-जा करणार आहेत. त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी जलवाहिनी आणि रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. दोन दिवसांत दोन्ही कामांमध्ये सुधारणा दिसून न आल्यास नागरिक, भाविकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरवून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

जलवाहिनीच्या कामामुळे मंदावली गती
शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही मंदावले आहे. जलवाहिनीचे काम होत नाही तोवर रस्त्याच्या कामाला गती मिळणार नाही.
-रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय

कोण करीत आहे काम
जलवाहिनीचे काम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत जीव्हीपीआर ही कंत्राटदार संस्था करीत आहे. २७८० कोटींची ही योजना आहे. २९ कि.मी. पर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम झाले आहे. रस्त्याचे काम: नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियामार्फत सेठी कंत्राटदार संस्था रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करीत आहे. २७० कोटींचा हा प्रकल्प असून, ३० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

Web Title: new pipeline and road work slow down; It took the Collector 3 hours to reach Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.