बीडमध्ये होणार ३५० खाटांचे नवीन शासकीय रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:34 IST2017-08-10T23:34:38+5:302017-08-10T23:34:38+5:30
बीड जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मंजूर २०० खाटांच्या विस्तारित जागेचा प्रश्न पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे.

बीडमध्ये होणार ३५० खाटांचे नवीन शासकीय रुग्णालय
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मंजूर २०० खाटांच्या विस्तारित जागेचा प्रश्न पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाकडून जागेचा आगाऊ ताबा रुग्णालयास देण्याचे आदेश गुरुवारी आयोजित बैठकीत दिले. दरम्यान, या २०० खाटांसह रुग्णालयाची ३५० खाटांची नवीन सुसज्ज इमारत होणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देऊन कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बीड नगरपालिका व जिल्ह्यातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस आ.जयदत्त क्षीरसागर, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, नगर विकास विभागाचे सचिव नितीन करीर, सी.पी.जोशी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी उपस्थिती होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विस्तारित जागेच्या प्रश्नांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले होते. अखेर या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या जागेचा आगाऊ ताबा देण्याचे निर्देश दिले. या २०० खाटांसह मातृत्व बाल आरोग्यासाठी १०० आणि आयुष रुग्णालयाकरिता ५० अशी एकूण ३५० खाटांची नवीन इमारत लवकरच उभी राहणार आहे.