अमरप्रीत चौकात नवीन उड्डाणपुल बांधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:11+5:302021-07-07T04:06:11+5:30
विमानतळासमोरील पूल हलविणे अशक्य : विभागीय आयुक्तांचे एनएचएआयच्या चेअरमनला पत्र औरंगाबाद : शहरातील वाहतुकीच्या वर्दळीचा चौक म्हणजे अमरप्रीत चौक ...

अमरप्रीत चौकात नवीन उड्डाणपुल बांधावा
विमानतळासमोरील पूल हलविणे अशक्य : विभागीय आयुक्तांचे एनएचएआयच्या चेअरमनला पत्र
औरंगाबाद : शहरातील वाहतुकीच्या वर्दळीचा चौक म्हणजे अमरप्रीत चौक आहे. नगरनाका, सातारा-देवळाई, जुने शहर आणि कॅम्ब्रिज चौकाकडून येणारी वाहतूक या ठिकाणी वारंवार खोळंबते. त्यामुळे चौकात नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) नवीन उड्डाणपूल बांधावा, असे पत्र विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एनएचएआयच्या चेअरमनला दिले आहे.
शहरासह इतर जिल्ह्यांच्या वाहतुकीसाठी मध्यवर्ती भागातील वर्दळीचा मार्ग म्हणजे जालना रोड आहे. मराठवाड्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने याच रस्त्याने जातात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीच्या खोळंब्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. त्यामुळे या रोडच्या रूंदीकरणासाठी ३८६ कोटींचा प्रस्ताव एनएचएआयने डीपीआरसह मंजूर केला होता. परंतु तो प्रस्ताव रद्द झाल्यानंतर फक्त ७४ कोटींतून या रोडवर चिकलठाणा विमानतळासमोर उड्डाणपूल आणि साईडड्रेनचे काम एनएचएआय करीत आहे. हे काम सुरू असताना विमानतळासमोरील उड्डाणपूल स्थलांतरित करून अमरप्रीत चौकात ते बांधावा, अशी राजकीय मागणी वर्षभरापासून सुरू आहे. यातून सुरुवातीला शिवसेना आणि भाजप सोशल मीडियातून आमने-सामने आले. त्यानंतर एमआयएमनेदेखील अमरप्रीत चौकात उड्डाणपुलाची मागणी केली. बीडबायपास आणि एनएच-२११ पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जालना रोडवरील वाहतूक कमी होईल, असे सध्या बोलले जात असले तरी जालना रोडवरील वाहतुकीची वर्दळ कमी होणार नाही. त्यामुळे अमरप्रीत चौकात नवीन उड्डाणपूल बांधावा, या लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या आधारे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी एनएचएआयच्या चेअरमनला पत्र दिले आहे.
आयुक्तांनी काय म्हटले आहे पत्रात
आयुक्त केंद्रेकर यांनी चेअरमनला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, एनएचएआयने विमानतळासमोर उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. सध्या अमरप्रीत चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. त्यामुळे तेथे पूल बांधावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केलेली आहे. त्या ठिकाणी ३० मीटर रस्ता उपलब्ध आहे. चौपदरी उड्डाणपुलाची तेथे गरज आहे. ७ मीटर भूसंपादन करावे लागेल. ३० मीटर जागेत दुपदरी पुलाचे बांधकाम तेथे होणे शक्य आहे. विमानतळासमोरील पूल अमरप्रीत चौकात उभारणे आता शक्य दिसत नाही. ही सगळी परिस्थिती पाहता अमरप्रीत चौकात अतिरिक्त उड्डाणपूल उभारण्यासाठी एनएचएआयने सकारात्मकरित्या पहावे.
औट्रम घाटातील बोगद्याचेही काम लवकर करा
एनएन-२११ या राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद ते धुळे या सुमारे ९० कि़लोमीटरच्या अंतरात कन्नड-चाळीसगांवच्या नजीक असलेल्या औट्रम घाटाचे काम तातडीने करण्याबाबतही आयुक्तांनी एनएचएआयला पत्र दिले आहे. घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबणे, अपघात होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे बोगद्याच्या कामाबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.