राष्ट्रीय स्पर्धेतून मिळाली नवी उर्जा
By Admin | Updated: January 13, 2017 00:39 IST2017-01-13T00:38:50+5:302017-01-13T00:39:24+5:30
उस्मानाबाद : खो-खो,कबड्डीसह व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात जिल्ह्याचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे.

राष्ट्रीय स्पर्धेतून मिळाली नवी उर्जा
उस्मानाबाद : खो-खो,कबड्डीसह व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात जिल्ह्याचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे. मात्र त्यानंतरही आजवर राष्ट्रीय स्तरावरच्या एकाही स्पर्धेच्या आयोजनाची संधी उस्मानाबादला मिळालेली नव्हती. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्या पुढाकाराने ही जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना ही अनोखी मेजवाणी मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी उर्जा मिळाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचा विविध क्रीडा प्रकारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कायम दबदबा राहिलेला आहे. येथील व्हॉलीबॉल आणि कबड्डीची मैदाने सरावाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत गाजत असायची. अशीच स्थिती खो-खो या क्रीडा प्रकाराचीही. म्हणूनच जिल्ह्यातील खो-खो खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नेहमीच विजयाचा झेंडा फडकविला आहे. खो-खो क्रीडा प्रकारात क्रीडा संघटक म्हणून शाहुराज खोगरे यांनी पुरस्कार पटकाविला आहे. तर डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिला क्रीडा मार्गदर्शनासाठी शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ही परंपरा पुढे कायम राहिली. सुजाता शानमे, रोहिणी आवारे आणि सुप्रिया गाढवे या तिघींनीही शिवछत्रपती पुरस्कारावर जिल्ह्याची मोहर उमटविली. उस्मानाबादच्याच सारिका काळे आणि सुप्रिया गाढवे या दोेघींनी भारताच्या खो-खो संघाचे तर जिल्ह्यातील १७ खेळाडूंनी राज्याचे नेतृत्व करण्याची कामगिरीही केली आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जिल्ह्यातील अश्विनी खटके, संगीता चव्हाण, मनिषा इंगळे, निकिता पवार, सुप्रिया गाढवे, सारिका काळे आणि राहुल घुटे यांनी बहुमान मिळविलेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात खो-खो ची शंभरपेक्षा अधिक मैदाने असून, यातील भोसले हायस्कूल, शरद पवार हायस्कूल, जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था ही उस्मानाबादमधील तीन मैदाने तसेच तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाचे मैदान अशी चार मैदाने राष्ट्रीय दर्जाची असून, येथून सातत्याने दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याचे काम सुरु आहे. अशातच शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांच्या पुढाकाराने आणि राज्य खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्यासह सहकार्याने उस्मानाबादेत २७ वी फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा घेण्यात आली.
अत्यंत देखणे नियोजन असलेल्या या स्पर्धेत देशातील १६ दिग्गज संघांनी सहभाग घेतला. या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडापे्रमींना राष्ट्रीय स्तरावरचे खेळ ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची अनोखी संधी मिळाली. क्रीडाप्रेमी असलेल्या उस्मानाबादकरांनीही या संधीचे अक्षरश: सोने करीत, स्टेडीयमवर हजारोंची उपस्थिती लावली. या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रालाही नव्याने उर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.