छत्रपती संभाजीनगर: गतवर्षीपासून येथे इलेक्ट्रीक व्हेईकल(ईव्ही) उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपाठोपाठ, या कंपन्यांच्या पुरवठादार लहान कंपन्याही उद्याेग स्थापित करण्याचा निर्णय घेत आहेत. येथे येत असलेल्या ईव्ही उद्योगांची संख्या पहाता छत्रपती संभाजीनगर आता ईव्ही हब म्हणून उदयास येऊ लागले आहे. आगामी काळात राज्यात येणारे ईव्ही उद्योग छत्रपती संभाजीनगरमध्येच स्थापित करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई येथे उद्योग संवाद परिषदेत दिले.
मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने राज्यातील विविध प्रांतांतील उद्योजकांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स झाल्या. ‘विकसित मराठवाडा – विकसित महाराष्ट्र’ या उद्योग संवाद परिषदेचे संचलन छत्रपती संभाजीनगर फर्स्टचे अध्यक्ष तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. या संवाद परिषदेत मसिआचे माजी अध्यक्ष किरण जगताप, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, सचीव अर्थर्वेशराज नंदावत, उद्योजक सुनील रायठठ्ठा, भरत गीते, योगेश मानधनी आदींनी सहभाग नोंदविला. या संवादाचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. यावेळी मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातही औद्योगिक विकास होणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. मराठवाड्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण असायला हवे,असा सूर संवाद परिषदेत उमटला. या संवाद परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे क्लस्टर विकसित करण्याचे संकेत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे येथे ऑटोमोबाइल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे तेथे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीज प्राधान्य असेल. तर नाशिक येथे एरोनॉटिकल इंडस्ट्री असल्याने तेथे डिफेन्स क्लस्टर विकसित केले जाऊ शकते. चंद्रपूर, गडचिरोली येथे स्टील इंडस्ट्रीला आवश्यक कच्चा माल उपलब्ध असल्याने तेथे स्टील उद्योगांना प्राधान्य असेल तर छत्रपती संभाजीनगरात टोयोटा-किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी हे मोठे ईव्ही उद्योग दाखल झाले आहेत. यासोबतच या कंपन्यांसाठी पुरवठादार म्हणून काम करणाऱ्या एम्ब्रिको, उनो मिंडासारख्या कंपन्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने दाखल झाल्या. छत्रपती संभाजीनगर ईव्ही हब होणार आहे.
औद्योगिक संस्कृतीला बळछत्रपती संभाजीनगर-जालना औद्योगिक पट्ट्यातील एमआयडीसी हद्दीबाहेरील लघु उद्योगांना वीज, पाणी, ड्रेनेज लाईन सिस्टीम, टेस्टिंग लॅब्स, डिजिटल मार्केटिंग व इक्विटी स्कीम्ससारख्या सेवा मिळणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर जपान, चीनप्रमाणे आपल्याकडेही शालेय शिक्षणांत कौशल्य विकास अभ्यासक्रम असल्यास औद्योगिक संस्कृतीला बळ मिळेल,असे आपण संवाद कौशल्य परिषदेत शासनाला सुचविले आहे.- किरण जगताप,माजी अध्यक्ष मसिआ.
ईव्ही उद्योगांचे हब होण्याचे संकेतउद्योग संवाद परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध प्रांतात कोणत्या उद्योगांना प्राधान्य असेल हे सांगितले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ईव्ही उद्योगांचे हब होण्याचे संकेत त्यांनी दिले. मराठवाड्यातील धाराशीव, बीड, परभणी, हिंगोली आदी ठिकाणी ॲग्रो बेस्ड एमआयडीसी विकसित व्हावी, यासाठी सरकारने विशेष धोरण ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.- मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर फर्स्ट