सांगवी बंधाऱ्यास बसणार नवे दरवाजे
By Admin | Updated: December 18, 2015 00:01 IST2015-12-17T23:53:05+5:302015-12-18T00:01:54+5:30
नांदेड : आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्याचे संपूर्ण २० दरवाजे बदलून त्याठिकाणी नवीन लोखंडी दरवाजे बसविण्यात येणार आहेत़

सांगवी बंधाऱ्यास बसणार नवे दरवाजे
नांदेड : आसना नदीवरील सांगवी बंधाऱ्याचे संपूर्ण २० दरवाजे बदलून त्याठिकाणी नवीन लोखंडी दरवाजे बसविण्यात येणार आहेत़ दरम्यान, हा बंधारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़
मागील आठवड्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगवी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे एक गेट तुटले होते़ त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले़ मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने नवीन दरवाजा बसविला़ या घटनेनंतर बंधाऱ्याच्या हस्तांतरणाचा विषय चर्चेत आला़ पाणी सोडण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरूस्ती करणे आवश्यक होते़ महापालिकेला हा बंधारा हस्तांतर झाला नव्हता़ त्यामुळे दुरूस्ती कोणी करायची हा घोळ सुरू होता़ यापूर्वी अनेकदा महापालिकेने कोल्हापुरी बंधारा हस्तांतरणासाठी पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते़ मात्र या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली़ यासंदर्भात ‘लोकमत’ने बंधारा हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते़ त्यानंतर पाटबंधारे विभागाने हा बंधारा महापालिकेला हस्तांतरण करण्याची प्रकिया सुरू केली़
यासंदर्भात मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले, पाटबंधारे विभागाकडून हा बंधारा महापालिकेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ हा बंधारा दुरूस्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलले असून संपूर्ण २० दरवाजे नवीन बसविण्यात येणार आहेत़ दरवाजे तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे़ सांगवी बंधाऱ्यातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेतंर्गत शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ हे पाणी कमी झाल्यानंतरच दरवाजे बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे़ पाणीपाळी नुसार पुन्हा उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येईल़ वर्षभरात २४० दिवस पाणी सोडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)