दुरुस्तीच्या खर्चात झाले असते नवीन बांध
By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:50:00+5:302014-11-10T23:57:25+5:30
उन्मेष पाटील , कळंब कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभुमी अभियानाअंतर्गत खर्च केलेल्या निधीबाबत आणखी धक्कादायक माहिती हाती आली आहे.

दुरुस्तीच्या खर्चात झाले असते नवीन बांध
उन्मेष पाटील , कळंब
कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभुमी अभियानाअंतर्गत खर्च केलेल्या निधीबाबत आणखी धक्कादायक माहिती हाती आली आहे. या अभियानाअंतर्गत तालुक्यातील ३ गावामध्ये १३ माती नाला बांधकामाच्या दुरुस्तीवर दाखविलेल्या लाखो रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या खर्चात नवीन माती नाला बांधकाम झाले असते. असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. त्यामुळे दुरुस्तीवर खरेच हा लाखोंचा खर्च झाला की येथेही कागदोपत्री घोडे नाचविण्यात आले. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कळंब तालुका कृषी कार्यालयाने तालुक्यातील गंभीरवाडी, बोरगाव (ध.) व ढोराळा या शिवारातील माती नाला बांधावरील दुरुस्ती सदर अभियानांतर्गत केल्याचे दाखविले आहे. यामध्ये गंभीरवाडी शिवारातील ३ माती नाला बांध दुरुस्तीवर ३ लाख ६० हजार ५१८ रुपये, बोरगाव धनेश्वरी येथील २ मातीनाला बंधारे दुरुस्तीवर २ लाख ४ हजार ३७० रु. तर ढोराळा येथील ८ मातीनाला बांधाच्या दुरुस्तीवर ६ लाख ६१ हजार ७६५ रुपये खर्च केल्याची नोंद आहे.
वास्तविक पाहता नवीन मातीनाला बांध तयार करण्यासाठी जवळपास ३ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. परंतु कृषी विभागाने या मानाबांच्या दुरुस्तीवर तसेच त्यातील गाळ काढण्यासाठी कमीत कमी ७० हजार रुपये व जास्तीत जास्त १ लाख २० हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. या दुरुस्तीच्या खर्चामध्ये काही नवीन माती नाला बांध तयार झाले असते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
या अभियानांतर्गत कृषी कार्यालयाने सिमेंट बंधारे व मातीनाला बांध मधून गाळ काढल्याचे म्हटले आहे. या कार्यालयाने लाखो रुपये खर्चून काढलेला गाळ गेला कोठे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यातील बहुतांश बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी गाळ वाहतुकीसाठी आलेली
वाहने कधी दिसलीच नाहीत, अशी माहिती दिली. तसेच जेथे शेतकरी स्वखर्चाने गाळ काढून शेतामध्ये टाकण्यास तयार होते. तेथे कृषी कार्यालयाने यावर निधी खर्च करण्याचे नियोजन केलेच कसे, असा प्रश्नही पुढे येतो आहे.